राज्यातील आदिवासी आश्रमशाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन यापुढे प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला होणार आहे. या दृष्टीने शासन कार्यवाही करत आहे. यामुळे राज्यातील एक हजारहून अधिक आश्रमशाळांमध्ये अध्यपनाचे काम करणाऱ्या १५ हजारहून अधिक शिक्षकांना दिलासा मिळणार आहे.
आश्रमशाळांतील शिक्षकांना वेतन वेळेवर मिळत नसल्यामुळे त्यांची नेहमीच ओरड होत असते. यामुळे राज्यातील इतर शिक्षकांप्रमाणे आश्रमशाळांतील शिक्षकांनाही १ तारखेला वेतन मिळावे, अशी मागणी शिक्षक आमदारांनी लावून धरली. या संदर्भात शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी अधिवेशनात प्रश्न विचारला. त्यांच्या या प्रश्नाला उत्तर देताना आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी शिक्षकांचे पगार १ तारखेला करण्यासंदर्भातील रचना कार्यान्वित झाल्याची घोषणा केली. राज्यात ५५२ शासकीय व ५५७ खासगी अनुदानित आश्रमशाळा असून सुमारे १५ हजारपेक्षा अधिक शिक्षक अध्यापनाचे काम करत आहेत.
या शिक्षकांचे वेतनही आता ऑनलाइन करण्याची वेगळी सुविधा निर्माण केली असून त्यामुळे आता १ तारखेला वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा