लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : अभिनेता ते प्रसिध्द दिग्दर्शक असा प्रवास करणाऱ्या आशुतोष गोवारीकर यांनी सात वर्षांपूर्वी अभिनेत्री प्रियांका चोप्राची निर्मिती असलेल्या ‘व्हेंटिलेटर’ या मराठी चित्रपटात महत्वाची भूमिका केली होती. आता पुन्हा एकदा ते ‘नेटफ्लिक्स’ या ओटीटी वाहिनीवर ‘काला पानी’ या वेबमालिकेतून अभिनेता म्हणून प्रेक्षकांसमोर येणार आहेत. मराठी – हिंदी चित्रपटात अभिनेता म्हणूनच कारकिर्दीची सुरूवात करणाऱ्या आशुतोष यांनी आजही अभिनय ही सर्वात कठीण गोष्ट असल्याचे मत व्यक्त केले.
मुंबईतील नेटफ्लिक्स स्टुडिओमध्ये ‘काला पानी’ या नव्याकोऱ्या वेब मालिकेचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. यावेळी या वेबमालिकेतील कलाकार, दिग्दर्शक असा सगळा चमू उपस्थित होता. गेली काही वर्ष दिग्दर्शनातच रमलेल्या आशुतोष गोवारीकर यांनी ‘काला पानी’ या वेब मालिकेतील भूमिका करण्यामागचे कारण स्पष्ट केले. ‘या मालिकेत काम करण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे याचे निर्माते समीर सक्सेना, अमित गोलानी आणि बिस्वपती सरकार. त्यांची ‘जादूगर’ ही वेब मालिका मी पाहिली होती, ती मला खूप आवडली. त्यामुळे या तिघांनी जेव्हा ‘काला पानी’ची कथा ऐकवली आणि भूमिका करण्याचा प्रस्ताव ठेवला तेव्हा मुळात मनोरंजनातून प्रबोधन करणारी ही कथा मला आवडली. आणि म्हणून मी ही वेब मालिका करायचे ठरवले’ असे आशुतोष यांनी सांगितले.
आणखी वाचा-नायर रुग्णालयाच्या फिरत्या नेत्रचिकित्सा उपक्रमाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार
‘काला पानी’ ही वेबमालिका शीर्षकापासूनच काहीशी गूढ आणि रंजक असल्याचे जाणवते. त्याबद्दल बोलताना या वेबमालिकेच्या कथानकानुसार एक स्वतंत्र विश्वच जणू उभारण्यात आले होते, असे गोवारीकर यांनी सांगितले. अशा रहस्यमय मांडणी असलेल्या रंजक कथेचा आपण एक कलाकार म्हणून भाग असावे याबद्दल मी उत्सूक होतो. समीर, अमित आणि बिस्वपती यांनी खूप चांगल्या पध्दतीने ही मालिका बनवली आहे. मालिकेचे कथानक अंदमान – निकोबार बेटांवर घडत असल्याने तिथे जाऊन ही मालिका चित्रित करण्यात आली आहे, असे सांगतानाच अंदमान-निकोबार बेटांवर चित्रीकरण करणे सोपे नव्हते असेही आशुतोष यांनी स्पष्ट केले. या बेटांवर चित्रीकरण सुरू असतानाही सेटवर साप, सरडे सरपटत असायचे. अधूनमधून प्राण्यांचेही दर्शन व्हायचेच, केवळ चित्रिकरणाच्या जागी नाही तर आम्ही ज्या हॉटेलमध्ये राहात होतो तिथेही अनेकदा प्राण्यांचा वावर असायचा. सुरुवातीला आम्हाला सगळ्यांना याची भीती वाटायची, पण नंतर आम्हाला अशा वातावरणात काम करण्याची सवय झाली, असा अनुभव त्यांनी सांगितला. आशुतोष गोवारीकर यांच्याबरोबर अभिनेता चिन्मय मांडलेकर आणि अमेय वाघ हे मराठमोळे कलाकारही या वेबमालिकेत महत्वाच्या भूमिकेत आहेत. ‘काला पानी’ ही वेबमालिका १८ ऑक्टोबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.