कुख्यात गुंड राजन निकाळजे ऊर्फ छोटा राजन याची आई लक्ष्मीबाई हिच्या निधनानिमित्त सांत्वन करण्यासाठी एकेकाळचा कट्टर गुंड आणि आता सर्व गुन्ह्य़ांतून निर्दोष सुटलेला अश्विन नाईक थेट छोटा राजनच्या चेंबूरच्या बालेकिल्ल्यात गेला होता. अंत्ययात्रेला येणाऱ्या व्यक्तींवर पाळत ठेवणाऱ्या पोलिसांच्या नजरेनेच सांत्वनासाठी खास करून आलेल्या अश्विनला हेरले आणि एकेकाळी या दोन टोळ्यांमधील टोकाच्या संघर्षांची चर्चा होऊ लागली.
लक्ष्मीबाई निकाळजे हिची अंत्ययात्रा छेडानगर येथून निघाली. या अंत्ययात्रेत काही फरारी गुंड असतील, अशी शक्यता असल्याने गुन्हे अन्वेषण विभागातील काही अधिकारी साध्या वेशात पाळत ठेवून होते. याच काळात अश्विन नाईक सांत्वन करण्यासाठी आला. त्याने छोटा राजनची पत्नी सुजाता ऊर्फ नानी तसेच भाऊ दीपक याचीही भेट घेतली. एकेकाळी दाऊद टोळीत असलेल्या छोटा राजनच्या विरोधात अमर नाईक आणि पर्यायाने अश्विन नाईक टोळीमध्ये जोरदार धुमश्चक्री होत होती. आईच्या निधनानिमित्ताने सांत्वनासाठी आलेल्या अश्विनमुळे आता त्यांच्यामध्ये तडजोड झाली असावी, अशी चर्चाही पोलीस वर्तुळात ऐकायला मिळते. अमर नाईक सक्रिय असताना त्याचे अनेक म्होरके दाऊदसाठी काम करणाऱ्या छोटा राजनने टिपले होते. त्यामध्ये प्रामुख्याने रम्या भोगले तसेच शिक्का नगर येथील दशरथ रहाणे या अमरच्या अत्यंत विश्वासू साथीदारांचा समावेश होता. दशरथ रहाणेची लालबाग येथे अंगावर शहारा येईल अशा रीतीने निर्घृण हत्या करण्यात आली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा