उच्च शिक्षणासाठी परदेशातील नामवंत शिक्षण संस्थांमधील प्रवेशाचे तिकीट समजल्या जाणाऱ्या ‘ग्रॅज्युएट रेकॉर्ड एक्झामिनेशन’ (जीआरई) या परीक्षेत अंधेरीच्या सरदार वल्लभभाई पटेल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नालॉजीत शिकणारी अश्विनी नेने हिने प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. ‘एज्युकेशन टेस्टिंग सव्‍‌र्हिसेस’ने (ईटीसी) नुकताच या स्पर्धेचा निकाल जाहीर केला. २२ वर्षांच्या अश्विनीने या परीक्षेत ३४० पैकी ३४० अशी १०० टक्के गुणांची कमाई करीत पहिला क्रमांक पटकावला आहे. जागतिक स्तरावर १०० टक्के गुणांची कमाई करणाऱ्या काही थोडय़ा विद्यार्थ्यांमध्ये अश्विनीचा समावेश आहे. जगभरातून लाखो विद्यार्थी जीआरई देत असतात. अमेरिका आणि इतर निवडक देशांमधील नामवंत शिक्षण संस्था आपल्या अभ्यासक्रमांसाठी जीआरईचे गुण प्रमाण मानतात. या परीक्षेत विद्यार्थ्यांच्या व्हर्बल रिझनिंग, क्वान्टिटेटिव्ह रिझनिंग, विश्लेषणात्मक लेखन आणि क्रिटिकल थिंकिंग यांचा कस लागतो. ही परीक्षा कोणत्याही विशिष्ट अभ्यासक्रमावर आधारित नसते. त्यामुळे त्यात आपली योग्यता स्पष्ट करणे विद्यार्थ्यांकरिता आव्हान असते. अश्विनीला या परीक्षेकरिता केआयसी या कोचिंग संस्थेकडून मार्गदर्शन लाभले.

Story img Loader