‘राखीव निधी’च्या व्याजाची रक्कम २०१७ ला मिळणार

मुंबईच्या वैचारिक आणि सांस्कृतिक समृद्घीचा वारसा सांगणाऱ्या ‘एशियाटिक सोसायटी’ संग्रहालयासाठी केंद्र सरकारने पाच कोटींचा राखीव निधी पाठवला आहे. मात्र हा राखीव (कॉर्पर्स) निधी असल्याने त्याच्यावर मिळणाऱ्या व्याजाची रक्कम वापरण्यासाठी पुढील वर्ष उजाडणार आहे. त्यामुळे सध्या ‘एशियाटिक सोसायटी’त चिंतेचे वातावरण असून राखीव निधीत तातडीने वाढ केली जावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

‘एशियाटिक सोसायटी’च्या संग्रहातील सुमारे एक लाख ग्रंथ, दोन हजारांहून अधिक पोथ्या, नकाशे, हस्तलिखित खजिन्याचे ‘डिजिटायझेशन’ करण्यात येणार आहे. या कामासाठी आणि संस्थेतील इतर दुरुस्तीच्या कामांसाठी केंद्र सरकारने दिलेला निधी वापरण्यात येणार आहे. मात्र या पाच कोटींच्या राखीव निधीवर व्याजाची मिळणारी रक्कम अत्यंत कमी तर आहेच. पण, तीही हाती येण्यासाठी पुढचे वर्ष उलटणार आहे. सध्याच्या व्याज दरानुसार या निधीवर फारतर चाळीस लाख रुपयांची रक्कम मिळू शकेल. यात तर एशियाटिक सोसायटीच्या कर्मचाऱ्यांचा वर्षभराचा पगार देणेही अशक्य आहे. त्यामुळे या निधीत वाढ करण्यात यावी, यासाठी एशियाटिक सोसायटीकडून प्रयत्न केले जात आहेत. या शिवाय राज्य सरकारकडून देण्यात येणारी रक्कमही अद्याप मिळाली नसल्याने सदस्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. केंद्र सरकारडून पाच कोटींचा राखीव (कॉपर्स) निधी संस्थेला पाठविण्यात आला आहे. मात्र एकूण ३० कोटींचा निधी अपेक्षित असल्याने जोपर्यंत हा संपूर्ण निधी उपलब्ध होत नाही, तोपर्यंत संस्थेची आर्थिक घडी व्यवस्थित बसणार नाही, असे एका सदस्यांनी सांगितले.

मुंबईचे सांस्कृतिक, वैचारिक वैभव

सर जेम्स मॅकिन्टॉश यांनी कला, विज्ञान आणि संस्कृती यांचे जतन करण्यासाठी १८०४ साली ‘बॉम्बे लिटररी सोसायटी’ची स्थापना केली. तीच आताची एशियाटिक सोसायटी. दुर्मिळ पुस्तकांबरोबरच संस्कृत, प्राकृत, पर्शियन, अरेबियन, मराठी, गुजराती, उर्दू, ग्रीक, लॅटिन, इटालियन, इंग्रजी आदी भाषांमधील हस्तलिखिते सोसायटीकडे आहेत. दान्ते या मध्ययुगीन इटालियन कवीच्या ‘डिव्हाइन कॉमेडी’ ची १४व्या शतकातील हस्तलिखित प्रत माउंटस्टुअर्ट एलफिन्स्टून यांनी या संग्रहाला दिली होती. ती आजही सोसायटीचे वैभव जपते आहे. एक लाखांहून अधिक ग्रंथ, अडीच हजार पोथ्या व हस्तलिखिते आणि १२०० हून अधिक नकाशे सोसायटीकडे आहेत. सोसायटीचा जुन्या नाण्यांचा संग्रह अव्वल म्हणावा असा आहे. या संस्थेने १८४०पासून भारतीय विद्वान आणि कर्तुत्ववान माणसे जोडली. सर माणेकजी सरसेटजी हे या सोसायटीचे पहिले भारतीय सदस्य होत. जगन्नाथ शंकरशेट, जमशेटजी जीजीभाई यांच्यासह विल्सन कॉलेजचे प्राचार्य डॉ. जॉन विल्सन, डॉ. भाऊ दाजी लाड, न्या. के.टी.तेलंग, सर जीवनगी मोदी, रामकृष्ण भांडारकर, डॉ. शंकर पंडित, दुर्गा भागवत हे विद्वान या संस्थेशी जोडले गेले होते. याच ठिकाणी महामहोपाध्याय पां.वा.काणे यांनी ‘धर्मशास्त्राचा इतिहास’हा ग्रंथ सिद्ध केला.

Story img Loader