Asiatic Society Mumbai: दक्षिण मुंबईतील हॉर्निमन सर्कल परिसरात दोन शतकांहून अधिक काळ दिमाखात उभ्या असलेल्या ऐतिहासिक एशियाटिक सोसायटीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. व्यवस्थापकीय समितीचा उदासीन कारभार आणि अपुऱ्या निधीमुळे सोसायटी डबघाईला आली असून केंद्र आणि राज्य सरकारने वेळीच लक्ष घालून संस्था ताब्यात घ्यावी, अशी मागणी एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष कॉ. प्रकाश रेड्डी यांनी केली आहे.

ऐतिहासिक वारसा असलेल्या या संस्थेची दुरावस्था आणि कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान याविषयी गुरुवारी पत्रकार परिषदेत कर्मचाऱ्यांनी माहिती दिली. एशियाटिक सोसायटीला ‘राष्ट्रीय महत्त्वाची संस्था’ हा दर्जा मिळायला हवा होता, मात्र त्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात संस्थेची व्यवस्थापकीय समिती अपयशी ठरली आहे.

Asiatic Society Info: एशियाटिक सोसायटी ज्ञान भांडाराचा समृध्द वारसा

कर्मचारी संघटनेचा व्यवस्थापनावर आरोप

व्यवस्थापकीय समितीची अकार्यक्षमता आणि पुरेशा निधीअभावी एशियाटिक सोसायटीतील ग्रंथालय आणि त्यातील दुर्मिळ पुस्तकांचे जतन करणे अशक्य झाले आहे. यातील काही दस्तावेजांचे अपुऱ्या देखभालीमुळे नुकसान झाले आहे. संस्थेचे भविष्य अंधारात आहे, असा आरोप रेड्डी यांनी केला आहे.

सध्या एशियाटिक सोसायटीमध्ये २५ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांना सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार वेतन दिले जाते, मात्र तेही वेतन पूर्ण दिले जात नाही, भत्ते दिले जात नाहीत, असा आरोप करत कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार वेतन देण्यात यावे, अशी मागणीही रेड्डी यांनी केली आहे. तसेच, सोसायटीला स्थिर उत्पन्न मिळावे, यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने ५० कोटी रुपयांचा राखीव निधी उपलब्ध करून द्यावा, ३० कोटी केंद्र सरकारने तर २० कोटी रुपये राज्य सरकारने उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी करण्यात आली.