मुंबईतील एका निर्मात्याच्या कार्यालयातील सुरक्षा रक्षकाच्या खुन्याला मुंबई पोलिसांनी बंगालमधून अटक केली आहे. हा खुनी या सुरक्षा रक्षकाला मारल्यानंतर बंगालला आपल्या गावी पळाला होता. त्याच्या चुलत भावाला मारणाऱ्यांचा त्याला खून करायचा होता. मात्र त्याआधीच पोलिसांनी कारवाई करत त्याच्या मुसक्या आवळल्या.
मंगळवार, ११ मार्च रोजी सूरज बडजात्या यांच्या राजश्री प्रोडक्शनच्या कार्यालयात त्यांच्या कार्यालयाच्या सुरक्षा रक्षकाचा मृतदेह आढळला होता. हा मृतदेह सुरक्षा रक्षक मेंहदी इमाम (७६) यांचा होता. इमाम हे बडजात्या यांच्या कार्यालयाची राखण करत असत.
या खुनाचा तपास करताना आम्हाला तोतन बिस्वास या व्यक्तीबद्दल माहिती मिळाली. इमाम काम करत असलेल्या सुरक्षा रक्षक एजन्सीमध्येच तोतनही काम करत होता. तोतन दर रविवारी रात्री इमाम यांना भेटायला बडजात्या यांच्या कार्यालयात यायचा. याबाबत अधिक तपास केल्यावर, तोतनने मालकाकडून १० मार्च रोजी १८०० रुपये घेतले होते आणि त्यानंतर तो गायब झाल्याचे समजले. तोतन कोलकाता येथे गेल्याची माहिती आम्हाला मिळाली असे पोलीस उपायुक्त धनंजय कुलकर्णी म्हणाले.
तोतनबाबतची माहिती समजल्यावर संशयाची सुई तोतनच्या दिशेने वळली आणि पोलिसांनीही कोलकाता गाठले. कोलकाता येथे तोतनच्या गुन्हेगारी पाश्र्वभूमीची पोलिसांना अधिक माहिती मिळाली. गेल्याच वर्षी घरगुती भांडणांमधून तोतनने त्याच्या बायकोवर गोळीबार केला होता. त्यानंतर तिच्या नातेवाईकांनी त्याच्या चुलत भावाला मारले होते. त्यानंतर तोतनने मुंबईत त्याच्या खात्यातून गेल्या काही दिवसांत २२ हजार रुपये काढून आपल्या मित्राला पिस्तुल विकत घेण्यासाठी दिले होते.
पोलिसांनी कोलकाता पोलिसांच्या मदतीने खबऱ्यांना कामाला लावले आणि त्यांना तोतन भारत-बांगलादेश सीमेवरील एका गावात आपल्या काकूकडे राहत असल्याचे समजले. पोलिसांनी या गावात छापा टाकत तेथून तोतनला अटक केली. इमामला जीवे मारल्यानंतर आपण पकडले जाऊ, याबाबत त्याची खात्री झाली होती. मात्र अटक होण्याआधी भावाच्या मारेकऱ्यांना ठार मारण्याचा त्याचा डाव होता, असे कुलकर्णी म्हणाले.
बिस्वासची अधिक चौकशी केली असता त्याने इमाम यांच्या खुनाचा तपशीलही उघड केला. ९ मार्चच्या रात्री तो राजश्री प्रोडक्शनच्या कार्यालयात गेला. त्या वेळी तो दारूच्या अंमलाखाली होता. त्याने इमाम यांच्या मोबाइलवरून एक फोन केला. त्यावर इमाम यांनी त्याला त्याच्या मोबाइलवरून फोन करण्यास सांगितले आणि त्यांची बाचाबाची सुरू झाली. संतापाच्या भरात त्याने इमाम यांना भोसकले आणि तेथून पलायन केले. पोलिसांनी बिस्वासला मुंबईला आणले असून अधिक चौकशी सुरू आहे.