मुंबई : आक्षेपार्ह चित्रीफीतीद्वारे तरूणीकडे खंडणीची मागणी करणाऱ्याला अंधेरी एमआयडीसी पोलिसांनी आसाममधून अटक केली. आरोपीने त्यासाठी बनावट संकेतस्थळाचा वापर केला होता. दिलदार हुसेन युन्नोस अली (२३) असे अटक आरोपीचे नाव आहे. अशाप्रकारे त्याने अन्य महिलांची फसवणूक केल्याचा पोलिसांना संशय असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
हेही वाचा >>> मुंबई : शाळेतील समुपदेशनादरम्यान दोन बहिणींवरील लैंगिक अत्याचाराची घटना उघड, मावशीच्या पतीविरोधात गुन्हा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेची इन्स्टाग्रामवर दिलदार खान याच्याशी ओळख झाली होती. आरोपीने महिलेशी मैत्री केली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात होताच दिलदारने तिला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर, दिलदारने व्हिडिओ कॉल करून महिलेचे आक्षेपार्ह स्थितीतील चित्रीकरण केले. तक्रारदार महिलेच्य नावाने बनावट संकेतस्थळ तयार करून त्यावर त्याने चित्रफीत व छायाचित्र अपलोड केले. याबाबत महिलेला समजताच त्यांना धक्का बसला. त्यांनी तात्काळ एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. आरोपीने गुन्हा दाखल झाल्यानंतरही महिलेला चित्रफीत व्हायरल न करण्यासाठी पैशाची मागणी करण्यास सुरुवात केली. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी तपासासाठी विशेष पथक तयार करण्याचे आदेश दिले. तपासादरम्यान आरोपी आसाममधील दुर्गम भागात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार आसामला जाऊन आरोपीला अटक करण्यात आली. तपासात त्याचे नाव दिलदार हुसेन युन्नोस अली (२३) असे असल्याचे समजले. तो आसामच्या पठासिमलो ब्लॉकमधील रहिवासी आहे. दिलदारने अशाच प्रकारे अनेकांना फसवल्याचा संशय असून एमआयडीसी पोलीस अधिक तपास करीत आहेत.