शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी स्मारकाच्या कामाबाबत नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते. त्यामुळे मेटे यांना धडा शिकवण्यासाठीच हा घातपात तर करण्यात आला नाही ना, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे. दरम्यान, ही बोट बुडालेल्या एका बोटीवर धडकल्याने तिला खालून हानी पोहोचली आणि ती बुडाली, असा दावा शिवसंग्रामचे अध्यक्ष आणि शिवस्मारक समितीचे प्रमुख विनायक मेटे यांनी केला आहे.
शिवरायांनाच युती सरकारकडून स्मारक नको असावे विखे-पाटील
भाजप-शिवसेनेचे फसवे सरकार अरबी समुद्रातील शिवस्मारकाचा वापर केवळ स्वत:च्या प्रसिद्धीसाठी करीत असल्याने खुद्द शिवाजी महाराजांनाच या सरकाकडून आपले स्मारक उभारायचे नसावे, अशी प्रतिक्रिया विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली आहे. एका तरुणाचा मृत्यू होणे हे अत्यंत दुर्दैवी असल्याचेही ते म्हणाले.
हे सरकार सतत शिवाजी महाराजांचे नाव घेऊन महाराष्ट्राची फसवणूक करत आहे. केवळ स्वत:च्या प्रसिद्धीसाठी शिवरायांच्या नावाचा वापर सुरू आहे. अशा दांभिक सरकारकडून आपले स्मारक उभारले जावे, हे कदाचित खुद्द शिवाजी महाराजांनाच रुचले नसावे. त्यामुळेच स्मारकाच्या पायाभरणीसाठी जाणाऱ्या बोटीला अपघात झाला असावा. ही घटना एक सूचक संकेत आहे. हे सरकार अपघाताने सत्तेत आले आणि अपघातानेच जाणार, असे विखे-पाटील यांनी म्हटले आहे.