उद्योगपती नेस वाडियाविरोधात आता त्यांच्या गाडीचालकाने मुंबई पोलिसांकडे धाव घेतली आहे. वाडिया यांनी शिवीगाळ आणि मारहाण केल्याची तक्रार चालकाने सीएसटी येथील माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात दाखल केली असून सिग्नल न तोडणे, वेगात गाडी न चालविल्याने वाडिया यांनी अनेकदा आपल्याला कानशिलात भडकावल्याची तक्रार दाखल केली आहे.

धीरेंद्र मिश्रा (३३) गेल्या तीन वर्षांपासून नेस वाडिया यांच्या गाडीचा चालक म्हणून काम करत आहे. बुधवारी वाडिया यांना फोर्ट परिसरात एका बैठकीसाठी जायचे होते. लवकर पोहोचण्यासाठी वाडिया यांनी मिश्राला गाडी वेगाने चालविण्यास सांगितले. तसेच वाटेत सिग्नल लागल्यास तो तोडण्यास बजावले. मात्र, मिश्रा याने गाडी नियंत्रणात चालवली. जेजे उड्डाणपूल ओलांडल्यानंतर एकदा सांगूनही कळत नाही का, गाडी धिम्या गतीने का चालवतोस, असे म्हणत वाडिया यांनी मिश्राला शिव्यांची लाखोली वाहण्यास सुरुवात केली. शेवटी चिडलेल्या मिश्रा याने गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली. त्या वेळी गाडीतून उतरवून वाडिया गाडी घेऊन निघून गेले. मिश्राने त्यानंतर माता रमाबाई पोलीस ठाणे गाठून सर्व प्रकाराची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली.  अदखलपात्र गुन्हय़ाची नोंद केल्याचे परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त डॉ. मनोज शर्मा यांनी सांगितले. २०१४ मध्ये इंडियन प्रीमियर लीगच्या वानखेडे स्टेडिअमवर सामन्यादरम्यान त्यांनी मैत्रीण प्रीती झिंटा हिला मारहाण  केली होती. त्या प्रकरणात वाडिया यांच्याविरोधात मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

Story img Loader