मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात यावेळी शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होत आहे. शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) उमेदवार ऋतूजा लटके आणि शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) उमेदवार मुरजी पटेल एकमेकांसमोर ठाकले आहेत. माजी आमदार रमेश लटके यांच्या निधनानंंतर झालेल्या पोटनिवडणुकीतून मुरजी पटेल यांनी माघार घेतली होती. मात्र त्यावेळी हुकलेली ही लढत आता होणार आहे. लटके यांना यावेळीही सहानुभूती मिळणार का याबाबत उत्सुकता आहे.
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या निवडणुकीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेचे माजी आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी ऑक्टोबर २०२२ मध्ये पोटनिवडणूक झाली होती. त्यावेळी शिवसेनेने लटके यांच्या पत्नी ऋतुजा यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. शिवसेनेची दोन शकले पडल्यानंतर ठाकरे यांच्याबरोबर राहिलेल्या आमदारांमध्ये रमेश लटके हे देखील होते. त्यामुळे ऋतुजा लटके यांना त्यावेळी दुहेरी सहानुभूती होती. त्या पोटनिवडणुकीसाठी भाजपच्यावतीने मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र नंतर त्यांनी माघार घेतली होती. त्यामुळे ऋतुजा लटके आणि मुरजी पटेल अशी लढत झाली नव्हती. यावेळी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मात्र मुरजी पटेल यांनी शिवसेना (शिंदे) गटात प्रवेश केला असून या पक्षाने त्यांना तिकीट दिले आहे. त्यामुळे यावेळी अंधेरी पूर्वमध्ये शिवसेनेच्या दोन गटात लढत होणार आहे. मशाल विरुद्ध धनुष्यबाण अशी ही लढाई होणार आहे.
हेही वाचा >>>घाटकोपरमध्ये अनधिकृत बारवर पोलिसांचा छापा; आठ बारबालांची सुटका
मुरजी पटेल हे कॉंग्रेसमधून भाजपमध्ये व आता शिवसेनेत (एकनाथ शिंदे) आले आहेत. ते कॉंग्रेसचे जिल्हा पदाधिकारी होते. २०१६ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. २०१९ निवडणुकीत मुरजी पटेल यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. त्यांचा कॉंग्रेसच्या मतदारांशी संपर्क आहे. त्यामुळे महाविकास आघाडी झाली असली तरी कॉंग्रेसची मते व्यक्तिगत पातळीवर मुरजी पटेल यांना मिळतील अशीही शक्यता वर्तवली जात आहे. अंधेरी पूर्व परिसरातून जाणारे मेट्रोचे जाळे हा आपल्या प्रयत्नाचा भाग असल्याचा प्रचार ते सध्या करीत आहेत. नुकतेच त्यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्नुषा वृषाली शिंदे उपस्थित होत्या.
हेही वाचा >>>‘आयडॉल’च्या विविध अभ्यासक्रमांसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
रमेश लटके यांना मानणारा वर्ग या विभागात असल्यामुळे त्यांची पारंपरिक मते, शिवसेनेची मते व कॉंग्रेससोबत असल्यामुळे ती मते देखील ऋतुजा लटके यांनी मिळतील असा विश्वास शिवसेनेला (उद्धव ठाकरे) आहे. २०१९ च्या निवडणुकीतील कॉंग्रसचे उमेदवार जगदीश कुट्टी यांची २७ हजार मते कोणाला मिळणार याबाबत उत्सुकता आहे. तसेच शिवसेनेने (एकनाथ शिंदे) तिकीट न दिल्यामुळे एनकाउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या पत्नी नाराज असून त्यांचाही लटके यांना पाठिंबा असल्याचा दावा शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) कार्यकर्त्यांनी केला आहे.
२०१९ मधील विधानसभा निवडणुकीत कोणाला किती मते
रमेश लटके (शिवसेना) – ६२,७७३
मुरजी पटेल (अपक्ष) – ४५,८०८
जगदीश अमीन कुट्टी (कॉंग्रेस) – २७,९५१
एकूण मतदान – १,४७,११७