मुंबई : प्रचारफेरी व प्रचारसभांचा धडाका, घरोघरी जाऊन संवाद साधण्यावर भर आणि आरोप – प्रत्यारोपांनी गाजलेल्या प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाचा दिवस अखेर उजाडला आहे. विविध विधानसभा मतदारसंघांमधील चुरशीच्या लढतींकडे सर्वांचे लक्ष लागले असून मुंबईत मतदानाला सुरुवात झाली आहे. मुंबईतील विविध मतदान केंद्रांवर सकाळच्या सत्रात तुरळक गर्दी पाहायला मिळत असून दुपारनंतर ही गर्दी वाढण्याची शक्यता आहे.
विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या दिवसाची सुरुवात ही पहाटेच झाली आहे. पहाटे सहा वाजताच कार्यकर्त्यांनी चाळी व इमारतींबाहेर मतदान माहिती कक्ष थाटले असून याठिकाणी मतदार यादी ठेवण्यात आल्या आहेत. या कक्षांभोवती संबंधित इमारत व चाळींमधील रहिवासी घोळका करीत असून मतदान केंद्र कुठे आहे? यादी क्रमांक कोणता? याबाबत विचारणा होत असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच सध्या मुंबईतील मतदान केंद्रांवर मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेले नागरिक आणि कामाला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची गर्दी पाहायला मिळत आहे. विविध ठिकाणी कामाला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांनी दुपारनंतर गर्दी वाढण्याची शक्यता आणि सायंकाळी उशीर झाल्यास मतदानाचा हक्क हुकण्याच्या शक्यतेने सकाळीच मतदानाचा हक्क बजावणे पसंत केले आहे.
मुंबईतील विविध मतदारसंघातील मतदान केंद्रांवर पुरुष व स्त्री आणि ज्येष्ठ नागरिक मतदारांसाठी वेगळी रांग आणि त्याठिकाणी पंखे, दिव्यांगांसाठी विशेष सुविधा, मार्गदर्शक फलक, मदतनीस – स्वयंसेवक, पिण्याचे पाणी, प्रथमोपचार केंद्र, माहिती व मदत कक्ष, प्रतीक्षा कक्ष, शौचालयाची व्यवस्था आदी सोयीसुविधा दिलेल्या पाहायला मिळत आहेत. तसेच ज्येष्ठ नागरिकांना व्यवस्थितरित्या मतदान केंद्रांपर्यंत नेले जात आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच विविध चाळी व इमारतीतील मतदान माहिती कक्षांवर नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही कार्यकर्त्यांनी केली आहे. याठिकाणी राजकीय पक्षांच्या कार्यालयातून कार्यकर्त्यांसाठी सकाळ व सायंकाळसाठी चहा, कॉफी आणि नाश्ता तसेच दुपारच्या जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. आपल्या परिचयाचे मतदार घराबाहेर पडले आहेत की नाही? यावर कार्यकर्ते विशेष लक्ष ठेऊन आहेत आणि अनेकांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे. त्यामुळे मुंबईत लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीला मतदानाची टक्केवारी वाढेल का? हे पाहणे महत्वाचे तसेच निर्णायक ठरेल.