मुंबई : राज्यात २०१९ साली शिवसेना-भाजपने विधानसभेची निवडणूक एकत्र लढवली होती. राज्यातील जनतेने या युतीलाच कौल दिला होता. सेना-भाजप एकत्र सत्ता स्थापन करावी अशीच लोकांची भावना होती. मात्र, त्यानंतरही आपण असंगाशी संग करत काँग्रेस-राष्ट्रवादीशी घरोबा केला. लोकभावनेला पायदळी तुडवली त्याचे काय? असा सवाल शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी आदित्य ठाकरे यांना विचारला आहे.
आम्ही बाळासाहेबांचा हिंदूत्ववादी विचार, लोकभावनेचा आदर करत शिवसेना-भाजप युतीचे सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे आम्हाला ना त्याची लाज बाळगण्याची गरज आहे ना राजीनामा देण्याची, असेही त्यांनी ठणकावले. दहिसर येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यांमध्ये भाषण करताना आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटातील आमदारांना लाज असेल तर त्यांनी राजीनामा देऊन निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हान दिले होते. त्यास गोगावले यांनी उत्तर दिले आहे. यापूर्वी झालेल्या चुका टाळून आता तरी असंगाशी संग सोडा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. शिवसेनाप्रमुखांच्या तालमीत तयार झालेल्या आम्हा मावळय़ांची हिंमत काय आहे हे उभ्या जगाने पाहिले आहे असे गोगावले यांनी नमूद केले.