वेगवेगळ्या राजकीय बैठकांवरून चर्चा रंगलेली असतानाच काँग्रेसनं पुन्हा एकदा स्वबळाचा नारा दिला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणूक काँग्रेस स्वबळारच लढेल, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. नाना पटोले यांनी भूमिका मांडल्यानंतर राजकीय पक्षांकडून वेगवेगळी मतं मांडली जात आहे. या भूमिकेवरून भाजपानंही काँग्रेसला चिमटा काढला आहे. ‘नाना पटोले यांना मुख्यमंत्री व्हावसं वाटतंय, तर राहुल गांधी यांना पंतप्रधान व्हावसं वाटतंय,’ असं म्हणत भाजपानं नाना पटोलेंना टोला लगावला आहे.

महाराष्ट्र काँग्रेसची सूत्रं हाती घेतल्यापासून नाना पटोले स्वबळाचा नारा देताना दिसत आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांनी काँग्रेस स्वतंत्र लढणार असल्याचं विधान केलं होतं. त्यानंतर गेल्या काही दिवसात राज्यात राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी वाढल्यानंतर त्यांनी आता पुन्हा स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या विधानाचा पुनरुच्चार केला आहे. नाना पटोले यांच्या या विधानावरून भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी टोला लगावला आहे.

हेही वाचा- नानाजी, तुम्ही वाफा दवडवा इतर दोन सरकार चालविताहेत; भाजपाचे काँग्रेसला दोन सवाल

आमदार भातखळकर यांनी ट्विट केलं असून, त्यात त्यांनी नाना पटोले यांना चिमटा काढला आहे. हे ट्विट त्यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनाही टॅग केलं आहे. नाना पाटोलेंना मुख्यमंत्री व्हावसं वाटतंय… राहुलजींनाही वाटतंय पंतप्रधान व्हावसं… जनतेला असं अजिबातच वाटत नाही. भविष्यात वाटण्याची शक्यताही नाही हाच दोघांचा प्रॉब्लेम आहे,” अशा शब्दात भातखळकरांनी टोला लगावला आहे.

हेही वाचा- ..तर पाठीत खंजीर खुपसल्यासारखं होईल, आम्ही स्वतंत्रच लढणार – नाना पटोले

या ट्विट आधी भातखळकरांनी आणखी एक ट्विट केलं होतं. ज्यात कलम ३७० वरून काँग्रेसवर टीका केलेली होती. “सत्तेवर आल्यावर काँग्रेस कलम ३७० पुन्हा लागू करेल असा दावा वरीष्ठ काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी केला आहे. काँग्रेस सत्तेवर आल्यावर उरलेला काश्मीर पाकिस्तानला आणि लडाख चीनला देऊ शकतो, हे देशाच्या जनतेला पुरते कळून चुकले आहे म्हणून उगाच सत्तेवर येण्याची स्वप्न पाहू नका…,” असं एका ट्विटमध्ये म्हटलं होतं.

नाना पटोले काय म्हणालेत?

“भाजपा हा कायम आमचा विरोधी पक्ष आहे. शरद पवार भाजपाविरोधात मोट बांधत असतील तर चांगली गोष्ट आहे. मात्र, महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. भाजपामध्ये गेलेले नेते पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत. काँग्रेसमध्ये येणाऱ्यांची आपल्याकडे मोठी यादी आहे, पण आता सर्वसामान्य कार्यकर्त्याला आमदार बनवलं जाईल,” असं नाना पटोलेंनी म्हटलं होतं.

Story img Loader