मुंबई : कुख्यात गुंड अरुण गवळी यांच्या कन्या आणि माजी नगरसेविका गीता गवळी यांना महापौर होईपर्यंत साथ देण्याचे विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी नुकतेच येथे जाहीर केले. गीता गवळी या मला बहिणीप्रमाणे असून अरुण गवळी ऊर्फ डॅडी यांच्याप्रमाणेच अखिल भारतीय सेनेच्या कार्यकर्त्यांना मीही प्रेम देईन. मी आता अखिल भारतीय सेनेतील एक सदस्य झालो असल्याचे समजावे, असे वक्तव्य नार्वेकर यांनी केले असून त्यावरून वाद होण्याची चिन्हे आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नार्वेकर हे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. नार्वेकर यांनी अखिल भारतीय सेनेकडून पाठिंबा मिळविण्यासाठी भायखळ्यातील हेरिटेज हॉटेलमध्ये एक बैठक घेतली. त्या वेळी गीता गवळी यांनी आरोग्य समिती, प्रभाग समिती अध्यक्षपद भूषविण्याबरोबरच वाटचालीचा उल्लेख केला.

हेही वाचा >>>साखर उत्पादनात राज्याची मक्तेदारी कायम; सलग तिसऱ्या वर्षी उत्तर प्रदेशला मागे टाकत सर्वाधिक उत्पादन

त्यानंतर नार्वेकर यांनी भाषणात म्हणाले, ‘ मी विधानसभा अध्यक्ष आहे. मला माझे अधिकार माहीत आहेत. मी अखिल भारतीय सेनेची साथ कधीही सोडणार नाही. अखिल भारतीय सेनेच्या परिवारात एक नवीन सदस्य सहभागी झाल्याचे समजावे. समजा. या बहिणीला (गीता गवळी) माझी भावाची साथ निव्वळ लोकसभेसाठी नाही, तर मुंबईची महापौर होईपर्यंत राहील.

गवळी सध्या तुरुंगात असून त्यांची मुदतपूर्व सुटका करण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नुकतेच दिले आहेत. नार्वेकर यांनी गवळीच्या दगडी चाळ आणि अखिल भारतीय सेनेचा पाठिंबा मिळविण्यासाठी गीता गवळी व कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यावरून समाजमाध्यमांवरूनही टीकाटिप्पणी सुरू झाली आहे. महापौर होण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन देण्यात काहीही गैर नाही. गवळी याच्या गुन्हेगारी कृत्याचे नार्वेकर यांनी कधीही समर्थन केलेले नाही, असे भाजपच्या वरिष्ठ नेत्याने स्पष्ट केले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Assured support for arun gawli daughter for mayor controversy over rahul narvekar statement amy