लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : अंधेरी पूर्व परिसरात सहार कार्गो मार्गावर गुरुवारी अचानक मुख्य जलवाहिनीवरील रस्त्याचा भाग खचला. पाणीपुरवठा सुरू करण्याच्या चावीचा भागच खचल्यामुळे तब्बल १२ फूल खोल खड्डा पडला होता. त्यामुळे या रस्त्यावर रस्ता रोधक (बॅरिकेड्स) उभारून खड्डा बंदिस्त करण्यात आला आहे.

अंधेरी पूर्व परिसरात सहार कार्गो मार्गावर हॉटेल अल्विटाच्या समोरच्या रस्त्यावर ही दुर्घटना घडली. या ठिकाणी पाण्याच्या चावीचा भाग असलेला रस्ताच खचला. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतुकीला धोका निर्माण झाला. या भागातून दररोज मोठ्या प्रमाणावर वाहने जात-येत असतात. तसेच शाळेची मुले, शाळांचा बसगाड्या येथून जात असतात. येथे १२ फूट खोल खड्डा पडल्यामुळे ‘वॉचडॉग फाऊंडेशन’ या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी येथे रस्ता रोधक उभे केले. मुंबई महानगरपालिकेच्या के-पूर्व विभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

आणखी वाचा-अखेर गुरुवारपासून गोखले पूल आणि बर्फीवाला पुलावरून वाहतूक सुरू

मुख्य जलवाहिनी फुटलेली नसून जलवाहिनीतून गळती होत आहे. पाणी गळतीमुळे रस्ता खचल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. अंधेरी परिसरात रात्री पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यावेळी नक्की कुठे गळती होते हे तपासून. मग दुरुस्तीचे काम हाती घेतले जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.