मुंबई : कफ परेड येथील नॅशनल कंपनी लॉ ट्रीब्युनलच्या दोन न्यायदालनांमध्ये अश्लील चित्रफीत लावण्यात आल्याचा प्रकार घडला. संगणकीय प्रणाली हॅक करून हा प्रकार करण्यात आला असून त्याबाबत कफ परेड पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कफ परेड पोलिसांसह गुन्हे शाखा, सायबर पोलीस याप्रकरणी तपास करीत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डेप्युटी रजिस्ट्रार (एनसीएलटी) चरण प्रताप सिंह यांनी स्वतः याप्रकरणी तक्रार केली आहे. तक्रारीनुसार १२ आणि १७ डिसेंबर रोजीला दोन वेळा लिंडा झेड मिलर या वापरकर्त्याने न्यायालयाच्या बेसेक्स या संगणकीय प्रणालीत प्रवेश केला होता. त्याशिवाय जॉनथन ॲडम अमेलिया नावाच्या व्यक्तीनेही १७ डिसेंबर रोजी संगणक प्रणालीत प्रवेश करून न्यायदालन क्रमांक ४ व ५ च्या स्क्रीनवर अश्लील चित्रफीत चालवली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १२ डिसेंबर रोजी दुपारी १.०८ च्या सुमारास चार मिनटे व १७ डिसेंबर रोजी ११ मिनिटे लिंडा झेड मिलर या वापरकर्त्याने संगणकीय प्रणालीत प्रवेश केला होता. तर जॉनथन ॲडम अमेलिया याने १७ डिसेंबर रोजी दुपारी २.०९ च्या सुमारास २९ मिनटे संगणकीय प्रणीलीत प्रवेश केल्याची माहिती प्राथमिक तपासणीत मिळाली. दोघांचेही आयपी ॲड्रेस मिळाले असून त्याद्वारे तपास सुरू आहे. याप्रकरणी कफ परेड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम २२१, २९४, २९६ व माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्यातील कलम ६६ व ६७ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा… बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण : मुलाच्या कृत्याची शिक्षा पालकांना का ? उच्च न्यायालयाचा प्रश्न

हे ही वाचा… भाजप कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा, काँग्रेसच्या मुख्य कार्यालयावरील हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल

न्यायालयीन कामकाजास अटकाव करण्याच्या उद्देशाने हा प्रकार करण्यात आल्याचा संशय आहे. याप्रकरणी कफ परेड पोलिसांसह गुन्हे शाखा व सायबर पोलिसांचीही मदत घेण्यात येत आहे. याप्रकरणी दोन आयपी ॲड्रेस सापडल्यामुळे दोन व्यक्तींचा सहभाग असल्याचा संशय आहे. त्यामुळे दोन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार तीन वेळा संगणकीय प्रणालीत प्रवेश करण्यात आला असून याप्रकरणी सायबर तज्ज्ञांच्या मदतीने तपास करण्यात असल्याचे सूत्रांनी सांगितले.