मंदीच्या फटक्यामुळे सुनेसुने दिसणारे मुंबईतील प्रमुख बाजार दिवाळीच्या खरेदीच्या निमित्ताने रविवारी गर्दीने फुलून गेले होते. रंगीबेरंगी आकाश कंदील, आकर्षक पणत्या, फटाके, कपडे आणि पूजेसाठी लागणारे साहित्य अशा नानाविध साहित्यांच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये झुंबड उडाली होती. प्रत्येक वस्तूच्या दरात २० ते २५ टक्क्य़ांनी वाढ झाल्याने लोकांनीही हात आखडता घेतच दिवाळीची खरेदी केल्याचे आढळून आले. मात्र, असे असले तरी खिशाला परवडण्याजोगी खरेदी करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत ग्राहकांची लगबग सुरू होती.
दादर, वांद्रे, मालाड, गोरेगाव, बोरिवली, भुलेश्वर, मस्जिद बंदर आदीं भागांत प्रमुख बाजारपेठा आहेत. दरवर्षी दिवाळीत या बाजारपेठांतील व्यापाऱ्यांकडून विविध खरेदी योजना जाहीर केल्या जातात. त्यातून कोटय़वधींची उलाढाल होत असते. यंदाही हे चित्र कायम असले तरी त्याला मंदीचा फटका बसल्याचे चित्र होते. दरम्यान, फराळापासून दिवाळीसाठी आवश्यक पूजा साहित्यापर्यंत सर्व वस्तू एकाच ठिकाणी उपलब्ध असलेल्या दुकानांत ग्राहकांनी अधिक पसंती दिली.
भांडवली बाजारावर लक्ष
दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपचे पानिपत झाल्याच्या पाश्र्वभूमीवर भांडवली बाजारात त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. त्यामुळे सिक्युरिटीज एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी) उपाययोजना सुरू केल्या आहेत. शेअर बाजारातील अपप्रवृत्तींनी या संभाव्य अस्थिरतेचा फायदा घेऊ नये म्हणून भांडवली बाजारावर करडी नजर ठेवली जात आहे. बिहारच्या निकालांचा आज, सोमवारी सुरू होणाऱ्या भांडवली बाजारातील घडामोडींवर परिणाम होण्याची शक्यता आहे. या वातावरणाचा फायदा घेऊन काही घटक शेअर बाजारात अफरातफरी घडवू शकतात, तसेच आपले हितसंबंध जपण्यासाठी बाजारात कृत्रिमरीत्या बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी सेबीने आवश्यक त्या खबरदारीच्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे, असे या क्षेत्रातील सूत्रांनी सांगितले.

Story img Loader