मुंबई : महानगरपालिकेने अर्थसहाय्य केलेल्या महिला बचत गटांच्या व्यवसायाला चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. गुढीपाडव्यानिमित्त अनेक मुंबईकरांनी महिला बचत गटांच्या पुरणपोळ्यांची चव चाखली. या दिवशी सुमारे ३ हजारहून अधिक पुरणपोळ्यांची ऑनलाईन विक्री झाली. नवी मुंबई व ठाण्यातूनही बचत गटांच्या पुरणपोळ्यांना विशेष मागणी होती. सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांनी देखील पुरणपोळी महोत्सवातून ऑनलाईन पुरणपोळ्या मागविल्या.
गरजू व मेहनती महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी महानगरपालिका प्रशासन विविध उपाययोजना आणि उपक्रम राबवित असते. महानगरपालिकेच्या नियोजन विभागामार्फत महिला बचत गटांना अर्थसहाय्य केले जाते. या महिलांच्या बचत गटांनी तयार केलेल्या उत्पदनांना आंतरराष्ट्रीय ओळख मिळावी, प्रसिद्धी मिळावी तसेच त्यातून महिलांना आर्थिक उत्पन्न मिळावे, यासाठी महानगरपालिका विविध प्रकारचे व्यासपीठ उपलब्ध करून देत असते. त्याअंतर्गत पालिकेच्या साहाय्याने महिला बचत गटांनी पुरणपोळी महोत्सव सुरू केला.
एकूण ५० बचत गटांना एकत्र आणून गुढीपाडव्यासाठी ‘पुरणपोळी महोत्सव’ हा उपक्रम राबविण्यात आला. https://shgeshop.com या संकेतस्थळावरून ऑनलाईन पुरणपोळ्या मागविण्याची सुविधा पालिकेने उपलब्ध करून दिली होती. संकेतस्थळावर मागणी नोंदविल्यानंतर नजीकच्या चार किलोमीटर परिसरातील महिला बचत गटाकडे याची नोंद झाली. त्यानंतर मागणी नोंदविलेल्या मुंबईतील ग्राहकांना ३० मार्च रोजी पुरणपोळी घरपोच उपलब्ध करून देण्यात आली. याबाबत बचत गटातील महिलांना पालिकेच्या नियोजन विभागामार्फत प्रशिक्षण देण्यात आले होते. मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईतूनही मोठ्या संख्येने पुरणपोळ्यांना मागणी आल्यामुळे सर्व बचत गटांचा हुरूप वाढला असून आणखी काम करण्याची त्यांना प्रेरणा मिळाली आहे.
एसएचजी ई शॉप (shgeshop) या संकेतस्थळावर मुंबईतील बचत गटांनी तयार केलेले विविध खाद्यपदार्थ, वस्तू उपलब्ध असून मुंबईकरांनी त्या आवर्जून खरेदी कराव्यात, असे आवाहन नियोजन विभागाच्या संचालिका डॉ. प्राची जांभेकर यांनी केले आहे.
बचत गटातील महिलांना व्यावसायिक प्रशिक्षण
पुरणपोळी महोत्सवातून खवय्यांसाठी घरपोच पुरणपोळी पुरविण्याची सुविधा पालिकेने उपलब्ध करून दिली. महानगरपालिकेच्या नियोजन विभागाने या उपक्रमासाठी पूर्वतयारी केली होती. संबंधित बचत गटातील महिलांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात आले होते. आपल्याकडे आलेली मागणी कशा पद्धतीने नोंद करून ठेवायची, त्यानंतर दर्जा आणि स्वच्छतेचे सर्व नियम पाळून स्वादिष्ट पुरणपोळी ग्राहकाला कशी घरपोच करायची, याबाबतही नियोजन विभागाने बचत गटातील महिलांना नि:शुल्क मार्गदर्शन केले. आपल्या उत्पादनांना बाजारपेठ कशी उपलब्ध मिळू शकते, बाजारात मागणी असल्यास त्या पद्धतीने पुरवठा कसा करावा, याचेही प्रशिक्षण बचत गटांना देण्यात आले होते.