मुंबई : माळढोक पक्ष्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असताना राजस्थानमधील जैसलमेर येथील सॅम माळढोक संवर्धन प्रजनन केंद्रात एकाच दिवसात तीन आणि आठवड्यात चार पिल्लांचा जन्म झाला आहे. तर रामदेवरा प्रजनन केंद्रात ६ एप्रिल रोजी पहिलेच पिल्लू जन्माला आले. या पिल्लांचा जन्म झाल्याने या प्रजातीच्या अस्तित्वासाठी नवीन आशा निर्माण झाली आहे.राजस्थानमधील वन्यजीव अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यातील सॅम प्रजनन केंद्रात २ एप्रिल रोजी तीन, तर २८ मार्च रोजी एक पिल्लू जन्माला आले. यामुळे सॅम प्रजनन केंद्रातील एकूण पिल्लांची संख्या आता ६ वर पोहोचली आहे.
या केंद्रातील अमन, टोनी, रेवा आणि शार्कीला फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात नवीन जोडीदार देऊन त्यांचे मिलन करण्यात आले. त्यानंतर अमन, रेवा आणि शार्कीने अंडी घातली. भारतीय वन्यजीव संस्थेच्या शास्त्रज्ञांनी ती ताब्यात घेऊन कृत्रिम उबवणीची प्रक्रिया सुरू केली. टोनीने दिलेल्या अंड्यातून २८ मार्च रोजी एक पिल्लू बाहेर आले, तर अमन, रेवा आणि शार्कीने दिलेल्या अंड्यांतून २ एप्रिल रोजी एकाच वेळी तीन पिल्लांचा जन्म झाला. तर २०२२ मध्ये कार्यान्वित झालेल्या रामदेवरा प्रजनन केंद्रात ६ एप्रिल रोजी एक पिल्लू जन्माला आले. सध्या ही सर्व पिल्ले तज्ज्ञांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आली आहेत. दरम्यान, एकाच दिवसात तीन पिल्ले आणि एका आठवड्यात चार पिल्ले जन्माला आल्याची ही पहिलीच वेळ असल्याचे डेझर्ट नॅशनल पार्कचे विभागीय वनाधिकारी ब्रिजमोहन गुप्ता यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितले.
नष्टप्राय यादीत माळढोक पक्ष्याचा समावेश झाल्यानंतर केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालय, डेहरादून येथील भारतीय वन्यजीव संस्था व राजस्थान वनविभागाने त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न सुरू केले. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून जैसलमेर जिल्ह्यातील सॅम व रामदेवरा येथे माळढोकचे संवर्धन प्रजनन केंद्र उभारण्यात आले. दोन्ही प्रजनन केंद्रामधील माळढोकची एकूण संख्या ५१ झाली आहे. सॅम केंद्रात २२, तर, रामदेवरा येथे २८ माळढोक आहेत. भारतीय वन्यजीव संस्थेच्या शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली या केंद्रांचे काम सुरू आहे. चोहोबाजूने बंदिस्त, पण नैसर्गिक अशा पक्षीगृहात माळढोक पक्ष्याच्या प्रजननासाठी काम केले जाते. भारतात १५० माळढोक असून निसर्ग संवर्धनासाठी काम करणाऱ्या इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशेन ऑफ नेचरच्या (आययुसीएन) लाल यादीत ‘नष्टप्राय’ या वर्गवारीत त्यांचा समावेश करण्यात आला आहे आहे. त्यांना वाचवण्यासाठी कृत्रिम प्रजनन केंद्राची मदत घेतली जात आहे. या १५० पक्ष्यांपैकी सुमारे ९० पक्षी केवळ दोन संरक्षित क्षेत्रात आढळतात. गेल्या तीन दशकांत या पक्ष्याची संख्या ७५ टक्क्यांनी कमी झाली आहे.माळढोकसाठी सॅम आणि रामदेवरा येथे दोन संवर्धन प्रजनन केंद्रे आहेत. माळढोकांसाठी २०१९ मध्ये स्थापन झालेल्या सॅम केंद्रात १६ आणि २०२२ मध्ये कार्यान्वित झालेल्या रामदेवरा केंद्रात १३ घरे आहेत.
माळढोक लुप्तप्राय होण्याची कारणे कोणती ?
अर्धशुष्क व गवताळ प्रदेश हा माळढोकचा अधिवास आहे. कालौघात विविध कारणांमुळे गवताळ प्रदेश नाहीसे झाले. उच्चदाब विद्युत वाहिन्यांशी माळढोकची वारंवार धडक होत असल्यानेही त्यांचा मृत्यू होतो. जंगली कुत्र्यांकडून शिकार, अनियंत्रित पशुधन, कीटकनाशकांचा वावर ही कारणेही माळढोक कमी होण्यास कारणीभूत आहेत. गेल्या दशकात माळढोक पक्ष्यांच्या अधिवासातून आणि भ्रमणमार्गातून जाणाऱ्या विजेच्या तारांवर आदळून त्यांची संख्या कमी झाली आहे. उच्चदाब विद्युतवाहिन्या हे माळढोकच्या मृत्युमागील प्रमुख कारण आहे.
संवर्धनासाठी कोणते प्रयत्न
कॉर्बेट फाऊंडेशनने माळढोक संवर्धन प्रस्तावासाठी मे २०१९ मध्येच पुढाकार घेतला आणि त्यांना बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, अरण्यक, गुजरात इकॉलॉजी सोसायटी, वन्यजीव संवर्धन संस्था, भारतीय वन्यजीव संरक्षण संस्था या भारतीय तसेच बर्डलाईफ इंटरनॅशनल आणि रॉयल सोसायटी फॉर द प्रोटेक्शन ऑफ बर्ड्स या आंतरराष्ट्रीय संस्थांनी समर्थन दिले.
सर्वोच्च न्यायालयाचे आदेश काय ?
माळरान अधिवास वाचवणे, भटक्या कुत्र्यांमुळे व इतर जंगली प्राण्यांमुळे होणारा त्रास कमी करणे, माळढोक प्रजनन कार्यक्रम राबवणे, यापुढे येणाऱ्या सौर व पवन ऊर्जेवर चालणाऱ्या ऊर्जा प्रकल्पांवर बंदी घालणे या महत्त्वाच्या सूचना याचिकेद्वारे करण्यात आल्या होत्या. त्यावर १९ एप्रिल २०२१ रोजी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने राजस्थान व गुजरात येथील माळढोक पक्ष्यांच्या अधिवासातील सर्व वीजतार येत्या एक वर्षात भूमिगत करण्याचे आदेश देण्यात आले. त्याचबरोबर भविष्यात माळढोकच्या अधिवासात येणाऱ्या सर्व वीजतारा भूमिगतच असाव्यात असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.