मुंबई : महानगरपालिकेने कांदिवलीमधील (पूर्व) आकुर्ली येथे उभारलेल्या कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रात सोमवारी विद्यार्थ्यांच्या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या रोजगार मेळाव्यात १ हजार ४९० उमेदवार नोकरीच्या शोधात आले होते. त्यापैकी पात्र ठरलेल्या ५४० उमेदवारांना नोकरी मिळाली. तसेच, त्यांना जागीच ऑफर लेटर देण्यात आले. या रोजगार मेळाव्यात २८ व्यावसायिक कंपन्या सहभागी झाल्या होत्या. दरम्यान, उपस्थित होतकरू विद्यार्थ्यांना कांदिवली (पूर्व) येथील कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रात उपलब्ध असलेल्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांची माहिती देण्यात आली.

महानगरपालिकेच्या नियोजन विभागामार्फत सुरू करण्यात आलेल्या कांदिवली येथील कौशल्य विकास केंद्राद्वारे विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणानंतर उपलब्ध असलेले व्यावसायिक शिक्षण आणि नोकरीची संधी याबाबत जनजागृती करण्यात येते. तसेच या ठिकाणी अनेक नामांकित कंपन्यांनी युवक वर्गासाठी प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याअंतर्गत सोमवारी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या रोजगार मेळाव्यात एकूण १ हजार ४९० उमेदवार सहभागी झाले होते. त्यापैकी ५४० उमेदवारांना नोकरीची संधी मिळाली.

या कंपन्यांमध्ये संधी

टीम लीस, योमन, जीनीअस, पॉवर पाईंट, ॲक्सिस, पॉलिसी बॉस्, आय करिअर, अदानी आदी २८ व्यावसायिक कंपन्या या मेळाव्यात सहभागी झाल्या होत्या. तसेच, पात्र उमेदवारांना तात्काळ स्वीकार पत्र (ऑफर लेटर) देण्यात आले.

कौशव्य विकास अभ्यासक्रम

या कौशल्य विकास केंद्रात हॉटेल मॅनेजमेंट, विक्री आणि व्यवस्थापन, आर्थिक साक्षरता, एसी, फ्रीज दुरुस्ती प्रशिक्षण, व्हीएफक्स-ॲनिमेशन प्रशिक्षण, शिवणकामाचे व्यावसायिक प्रशिक्षण, पंचतारांकित हॉटेल्समधील नोकरीसाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण आदी विविध प्रकारचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

मुख्याध्यापकांमध्ये जनजागृती

या केंद्रात उपलब्ध असलेल्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांबाबत इयत्ता नववी आणि दहावीतील विद्यार्थ्यांना माहिती मिळावी, विद्यार्थ्यांना त्याचे महत्त्व पटावे यासाठी महानगरपालिका प्रयत्नशील आहे. महापालिकेतर्फे माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापकांसाठी शनिवारी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सध्या इयत्ता नववी आणि दहावीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना, तसेच पालिकेच्या शाळेतून उत्तीर्ण होऊन बाहेर पडलेल्या माजी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापकांनी या केंद्राबाबत माहिती द्यावी हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू होता.

महानगरपालिकेच्या शाळांतून दहावी उत्तीर्ण होऊन उच्च शिक्षणासाठी बाहेर पडलेले विद्यार्थी विविध माध्यमातून शाळेतील शिक्षकांच्या संपर्कात असतात. शालेय अभ्यासक्रमानंतर संबंधित विद्यार्थी भविष्यात कुठले व्यावसायिक क्षेत्र निवडावे, यासाठी शिक्षकांचा सल्ला घेतात. अशा विद्यार्थ्यांना मुख्याध्यापकांनी कांदिवली येथील कौशल्य विकास केंद्राची माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले.