मुंबई : अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतूवरील वाहनांची संख्या सरासरी कमी आहे. तसेच आता प्रवासी आणि पर्यटकांचा अटल सेतूला असणारा प्रतिसाद कमी झाल्याचे निदर्शनास आले आहे. परंतु, अटल सेतूमुळे मध्य रेल्वेची वार्षिक कमाई कोट्यवधीच्या घरात पोहोचली आहे.जगामधील सर्वाधिक लांबीचा समुद्री पुलाच्या यादीत १२ व्या स्थानी आणि देशात प्रथम स्थानी असलेल्या अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतू जानेवारी २०२४ मध्ये प्रवाशांसाठी खुला करण्यात आला. गेल्या वर्षभरात अटल सेतूवरून ८३ लाख ६ हजार ९ वाहने धावली. या सेतूमुळे मुंबई आणि नवी मुंबईदरम्यानचा प्रवास अधिक सुकर आणि वेगवान झाला आहे.
मुंबई – पुणेदरम्यान प्रवास करणारे प्रवासी अटल सेतूला पसंती देत आहेत. या सेतूवरून दररोज सरासरी २२ हजार ६८९ वाहने धावतात, तर १४ जानेवारी २०२४ रोजी एका दिवसात सर्वाधिक ६१ हजार ८०७ वाहनांनी अटल सेतवरून प्रवास केला. परंतु, भरमसाठ पथकर आणि वाशी पथकर नाक्यांवर हलक्या वाहनांना देण्यात आलेली पथकर माफी यामुळे अटल सेतूकडे बहुसंख्य वाहनचालकांनी पाठ फिरवली आहे. असे असले तरी अटल सेतूमुळे मध्य रेल्वेला आर्थिक लाभ होत आहे.
मध्य रेल्वेने प्रवासी सुविधा आणि भाड्याव्यतिरिक्त महसूल निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण टप्पे पार केले आहेत. मध्य रेल्वेने प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी आणि महसूल वाढवण्याच्या प्रयत्नात, चालू आर्थिक वर्षात अतिरिक्त प्रयत्न केले. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने जाहिरातींसाठी नव्या जागा शोधून त्यांच्या लिलावातून विविध कंत्राटे देण्यासाठी सक्रिय पावले उचलली आहेत. हे प्रयत्न भाड्याव्यतिरिक्त (नॉन-फेअर रेव्हेन्यू) महसूल वाढवण्याच्या आणि त्यातून प्रवाशांना चांगल्या सेवा देण्याच्या व्यापक धोरणाचा एक भाग आहेत.
शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूदरम्यान आजूबाजूची जमीन मध्य रेल्वेच्या हद्दीतील आहे. या जमिनीवर मध्य रेल्वेने आऊट ऑफ होम जाहिरात (ओओएच) सुरू केली आहे. अटल सेतूजवळील तीन ठिकाणच्या जागी मध्य रेल्वेने जाहिरातबाजी सुरू केली आहे. यामुळे मध्य रेल्वेला वार्षिक १.१६ कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे. तर, आऊट ऑफ होम जाहिरातीमधून एकूण ४९.१४ कोटी रुपये महसूल रेल्वेला मिळाला आहे.
मध्य रेल्वेवरील लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्यांच्या बाहेरील बाजूस जाहिरात लावून कोट्यवधी रुपये महसूल मिळवला आहे.मध्य रेल्वेवर २६ रेल्वेगाड्यांवर व्हिनाइल रॅपिंग लावून विविध जाहिरात केली जात आहे.तीन मार्गावरील वंदे भारत एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन, डेक्कन एक्स्प्रेस, इंद्रायणी एक्स्प्रेस, तेजस एक्स्प्रेस आणि जन शताब्दी एक्स्प्रेसमध्ये ‘फूड ट्रे’ची व्यवस्था केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – मडगाव तेजस एक्स्प्रेसच्या आसनाच्या हेडरेस्ट आणि राजधानी एक्स्प्रेसच्या काचेच्या दरवाजावर जाहिरात करण्यात आली आहे. याद्वारे १५.५४ कोटी रुपये महसूल मध्य रेल्वेला प्राप्त झाला आहे.पनवेल, कल्याण, कर्जत, लोणावळा आणि ठाणे येथे प्रतीक्षालय, बॅटरीवर चालणारी वाहने, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, पनवेल येथे बाईक आणि पार्सल पॅकिंग, मेल/एक्स्प्रेस आणि प्रवासी गाड्या आणि इतरांमध्ये विविध वस्तूंच्या विक्रीद्वारे सुमारे १०.४० कोटी रुपयांचे उत्पन्न मध्य रेल्वेला मिळाले आहे.