मुंबईः सुमारे २२ किलोमीटर लांबीच्या शिवडी – न्हावाशेवा अटल सेतूवरील १०.४ कि.मी. हद्दीतील वाहतूक नियमनाची जबाबदारी मुंबई पोलिसांवर असून उर्वरित भाग नवी मुंबई पोलिसांच्या अखत्यारित येणार आहे. या सागरी सेतूवर प्रतीतास १०० किलोमीटर वेग मर्यादा घालण्यात आली असून अटल सेतूवरून तीनचाकी व दुचाकी वाहनांना मनाई आहे.
अटल सेतू १२ जानेवारीपासून सुरू होत असल्यामुळे वडाळा, पायधुनी व आझाद मैदान वाहतूक पोलीस विभागांना अतिरिक्त संख्याबळ पुरवण्यात आले आहे. तरीही सध्या या सेतूवरून रफी किडवाई मार्गावर बाहेर पडण्यासाठी व्यवस्था नसून सेतूला जोडणाऱ्या मार्गिकांवर वाहतूक कोंडी होण्याची दाट शक्यता आहे.
हेही वाचा…कन्नमवार नगर म्हाडा वसाहत पुनर्विकासाचा मार्ग १७ वर्षांनी मोकळा!
शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूवरील १० किलोमीटर ४०० मीटर इतक्या हद्दीच्या वाहतूक नियमनाची जबाबदारी मुंबई पोलिसांवर आहे. वडाळा वाहतूक विभागावर वाहतूक नियमनाची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. याशिवाय पूर्व मुक्त मार्ग व आझाद मैदान परिसरातील वाहनांची संख्याही या सेतूमुळे वाढणार असून तिन्ही वाहतूक चौक्यांना अतिरिक्त वाहतूक पोलीस उपलब्ध करण्यात आले आहेत. तर उर्वरित भाग नवी मुंबई पोलिसांच्या अखत्यारित येणार आहे.
या सेतूवर प्रतीतास १०० किलोमीटर वेग मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. तसेच चढण व उतरणीच्या भागात ती प्रतीतास ४० किमी. असणार आहे. त्यावर तीन चाकी व दुचाकी वाहनांना मनाई आहे. त्यासाठी सेतूवर सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून त्यामुळे मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षातून अटल सेतूवरील वाहतुकीची पाहणी करणे शक्य होणार आहे.मुंबईतून कोकण किंवा पश्चिम महाराष्ट्रात सुखकारक प्रवासासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने या पुलाची उभारणी केली असून या प्रकल्पाचा खर्च २१ हजार २०० कोटी रुपयांवर गेला आहे.
हेही वाचा…बोरिवलीच्या श्रीकृष्णनगर पुलाला वन विभागाची परवानगी; लवकरच पुढच्या टप्प्याचे काम सुरू होणार
प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून हा सागरी सेतू वाहतुकीसाठी खुला होत आहे. प्रकल्पावर झालेला खर्च वसूल करण्यासाठी सुमारे ३० वर्षांसाठी पथकर आकारण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला असून त्यासाठी नवी मुंबईतील उलवेजवळ शिवाजीनगर आणि चिर्ले (गव्हाण) या दोन ठिकाणी पथकर नाके उभारण्यात येणार आहेत. अटलसेतुचा मुंबईकडील भाग शिवडी पोलिसांच्या हद्दीत येत आहे. तर नवी मुंबईकडील भागाची हद्द न्हावा शेवा पोलिसांकडे येणार आहे.
सुरूवातीला वाहतूक कोंडी होण्याची शक्यता
आझाद मैदान, पायधुनी व वडाळा येथील सागरी सेतूला जाणाऱ्या मार्गिकांवर सुरूवातीचे काही दिवस अतिरिक्त वाहतूक पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. पण या सेतुला रफी किडवाई मार्गावर बाहेर पडण्यासाठी सध्या व्यवस्था नाही. त्यामुळे सुरवातीचे काही दिवस सेतूला जोडणाऱ्या मार्गिकांवर वाहतूक कोंडी होण्याची दाट शक्यता आहे. शिवडी-वरळी उड्डाणपूल व अटल सेतूला जोडणाऱ्या मार्गाच्या बांधकामाच्या वेळी रफी किडवाई मार्ग येथून बाहेर पडण्याचा मार्ग बांधण्याचे नियोजन आहे. त्यानंतर वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, असे सूत्रांनी सांगितले.