Atal Setu Viral Video : अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूवरील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. या व्हिडिओत दावा केल्याप्रमाणे संबंधित आत्महत्या करत होती. परंतु, त्याचवेळी न्हावा शेवा वाहतूक शाखेचे पोलीस तिथे आले आणि त्यांनी तिचा जीव वाचवला. अटल सेतूवरील हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. परंतु, मी आत्महत्या करत नव्हते तर देवांचे फोटो समुद्रात फेकत होते असं या संबंधित महिलेने पोलिसांना सांगितले असल्याचे वृत्त फ्री प्रेस जर्नलने दिले आहे.
शुक्रवारी (१६ ऑगस्ट) सायंकाळी ७ च्या दरम्यान मुलुंडवरून एक महिला कॅबने अटल सेतूवर आली. तिने अटल सेतूवर कॅब थांबवायला सांगितली. कॅबमधून उतरताच ती रेलिंगच्या पलिकडे उभी राहिली. हा प्रकार कॅबचालकाने पाहिला. त्यामुळे त्याने प्रसांगवधान राखत महिलेला धरून ठेवले. याच काळात गस्तीवर असलेले पोलीस तिथे पोहोचले. या पोलिसांनी तिला बाहेर काढले.
हेही वाचा >> Atal Setu : अटल सेतूवर कार थांबवत तरुणाची समुद्रात उडी, डोंबिवलीतल्या इंजिनिअरने आयुष्य संपवलं
मुलुंड येथे राहणाऱ्या या ५६ वर्षीय महिलेचं नाव रीमा पटेल असं असून ती देवांचे फोटो समुद्रात विसर्जित करत होती, असं तिने पोलिसांच्या जबानीत म्हटलं आहे. दरम्यान, याबाबत न्हावा शेवा वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक गुलफरोज मुजावर म्हणाले, “आमची पेट्रोलिंग व्हॅन त्याच रस्त्यावर गस्त घालत असताना त्यांना उभी केलेली कार दिसली. तसेच, शेलार टोल नाक्याच्या टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी पुलावर एक कार थांबलेली आणि एक महिला रेलिंगवर उभी असल्याचे दिसल्याने त्यांनी पोलिस पथकाला सतर्क केले होते.”
अटल सेतूवरून एका महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी तिला वाचवलं. pic.twitter.com/CZbfEPcwdI
— Viral Content (@ViralConte97098) August 16, 2024
कॅबचालकाच्या प्रसांगवधनामुळे…
संबंधित महिला आधी ऐरोली पुलावर गेली होती. परंतु, तिच्या अध्यात्मिक गुरुंनी खोल समुद्रात हे देवांचे फोटो फेकायला सांगितले. त्यामुळे ती अटल सेतूवर आली. अटल सेतूवर पोहोचल्यानंतर ती एक एक फोटो समुद्रात टाकत होती. तेवढ्यात तिला वाहतूक पोलिसांच्या जीपचा आवाज आला आणि तिचा तोल गेला. त्यामुळे ती पडली. याच काळात कॅब चालकाला संशय आल्याने ती फोटो टाकत असताना तो रेलिंगच्या अलीकडेच उभा होता. जेव्हा ती खाली पडली तेव्हा कॅबचालकाने तिच्या केसांनी तिला पकडून ठेवले. तेवढ्यात वाहतूक पोलीस आले आणि तिची सुटका केली, अशी माहिती न्हावा शेवा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पटेल यांच्या एका नातेवाईकाने त्यांना सांगितले की, ती अपत्यहीन असल्याने काही दिवसांपासून ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होती. घटनेच्या वेळी तिचा पती पुण्यात होता, याची माहिती पोलिसांना देण्यात आली.