रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांना राज्यसभेची खासदारकी देण्याबाबत भाजपमध्ये विचार सुरू आहे. बिहार किंवा मध्य प्रदेशातून त्यांची राज्यसभेवर वर्णी लावली जाण्याची शक्यता आहे. आठवले यांना खासदारकी देऊन एकाच वेळी दलित समाजाची सहानुभूती मिळविण्याची आणि शिवसेनेवर कुरघोडी करण्याची ही भाजपची खेळी असल्याचे मानले जात आहे. आठवले हे शिवसेना-भाजपबरोबर युती केल्यानंतर लोकसभेच्या किमान तीन जागा आणि आपल्या स्वत:साठी राज्यसभेची खासदारकी मिळावी अशी सातत्याने मागणी करीत आहेत. गेल्या वर्षी त्यांनी त्यासाठी शिवसेनेकडे आग्रह धरला होता, परंतु शिवसेनेने त्यांना केवळ आशेवर ठेवून ऐनवेळी अनिल देसाई यांची राज्यसभेवर वर्णी लावली. त्यामुळे आरपीआयचे कार्यकर्ते नाराज झाले होते. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आता पुन्हा आरपीआयच्या वतीने आठवले यांच्या खासदारकीसाठी कधी शिवसेनेकडे, तर कधी भाजपकडे मागणी केली जात आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आठवले यांनी तशी मागणी केली होती. त्यावर उद्धव यांनी आपल्या खासदारकीसाठी भाजपकडे शब्द टाकण्याचे आश्वासन दिले होते. तर आठवले यांनी अलीकडेच दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंग यांची भेट घेऊन त्यांच्याकडेही राज्यसभेचा विषय काढला.त्यानंतर भाजपमध्ये आठवलेंना राज्यसभेची खासदारकी देण्याबाबत विचार सुरू आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा