शिवसेनेबरोबर राहून भविष्यात राज्याची सत्ता मिळेल आणि त्यातील काही वाटा आपल्याही पदरात पडेल, अशी आशा बाळगून असणाऱ्या रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले आता हळूहळू आपल्या मूळ अजेंडय़ाकडे वळू लागले आहेत. झोपडपट्टय़ा आणि झोपडीधारक हाच आरपीआयचा मतदार आहे; परंतु याच प्रश्नावर शिवसेना व आरपीआयमध्ये टोकाचे मतभेद आहेत. तरीही आठवले यांच्या उपस्थितीत उद्या मुंबईतील झोपडपट्टय़ांच्या प्रश्नावर परिषद होणार आहे.
राज्यात गेल्या वर्षी शिवसेना-भाजप-आरपीआय अशी महायुतीच्या नावाने नवी राजकीय आघाडी तयार झाली; परंतु शिवसेना-भाजपचा अजेंडा आणि आरपीआयचा अजेंडा यात मोठा फरक आहे. शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या भूमिकेशी आरपीआयने जुळवून घेण्याचा प्रयत्न केला, परंतु आरपीआयच्या अजेंडय़ाला मात्र सेनेकडून अजून अधिकृत मान्यता मिळालेली नाही. तरीही २०१४ च्या निवडणुका सेना-भाजपबरोबर राहूनच लढवायच्या या भूमिकेवर रामदास आठवले ठाम आहेत. त्यासाठी आठवले यांनी झोपडपट्टय़ांच्या प्रश्नावर परिषद घेऊन आपल्या मतदाराला पुन्हा पक्षाकडे वळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
दहिसर पश्चिम येथील गणपत पाटील नगरजवळील चिंतामणी गार्डन येथे आयोजित करण्यात आलेल्या परिषदेत झोपडपट्टय़ांच्या प्रश्नावर ठोस भूमिका घेण्याचे ठरणार आहे. विशेष म्हणजे १९९५ नंतरच्या झोपडय़ा अधिकृत करू नयेत, अशी शिवसेनेची भूमिका असताना उद्याच्या आठवले यांच्या परिषदेत २००९ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मतदान करणाऱ्या झोपडीधारकांना संरक्षण द्यावे म्हणजे त्या कालावधीपर्यंतच्या झोपडय़ांना अधिकृत मान्यता द्यावी, अशी प्रमुख मागणी करण्यात येणार आहे. मुंबईतील झोपडीधारक मोठय़ा संख्येने या परिषदेला उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती आरपीआयचे प्रवक्ते अर्जुन डांगळे यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा