विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या भोंगळ कारभाराचा विद्यार्थ्यांना फटका

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिषेक तेली

मुंबई : रखडलेले निकाल असो किंवा विस्कळीत झालेले परीक्षांचे वेळापत्रक.. मुंबई विद्यापीठाचा परीक्षा विभाग कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असतो. या भोंगळ कारभारामुळे विद्यार्थ्यांची तारांबळ उडते. मुंबई विद्यापीठाच्या संज्ञापन व पत्रकारिता विभागाच्या द्वितीय सत्र ‘एटीकेटी’ची परीक्षा येत्या २ डिसेंबरपासून सुरू होत आहे. असे असताना विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरण्यासाठी ३० नोव्हेंबर रोजी सकाळी सांताक्रुझ परिसरातील मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलात तातडीने बोलावण्यात आले. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली.

विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्याबाबत पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती. तसेच संकेतस्थळाचा वापर करतानाही विद्यार्थ्यांना अनेक अडथळे येत होते. यामुळे अर्ज कसा भरायचा असा संभ्रम विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाला होता. ‘या परीक्षेसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरण्यात येणार आहेत आणि यासाठी ३० नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत शेवटची मुदत होती. विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्यासाठी रोख १,८०० रुपये घेऊन दुपारी ३ वाजेपर्यंत संज्ञापन व पत्रकारिता विभागात हजर रहावे. या मुदतीत अर्ज भरता आला नाही, तर परीक्षेला बसता येणार नाही. तुमची एटीकेटी तशीच राहील’, असे विद्यार्थ्यांना सकाळी सांगण्यात आले.

हेही वाचा >>> मुंबई महानगरपालिकेची प्रभागसंख्या कमी करण्याच्या कायद्याला आव्हान; राज्य सरकारचा उच्च न्यायालयात दावा

मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलात मुंबई, ठाणे, वसई – विरार, पालघर, कल्याण – डोंबिवली आदी विविध परिसरातून विद्यार्थी शिकण्यासाठी येतात. यामुळे इतक्या कमी वेळेत सांताक्रुझला पोहोचून अर्ज कसा भरायचा असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला होता. संज्ञापन व पत्रकारिता विभागापर्यंत पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांना तारेवरची कसरत करावी लागत होती. सांताक्रुझ – कुर्ला रेल्वे स्थानक ते मुंबई विद्यापीठ कलिना संकुल यादरम्यान वाहतूक कोंडीचाही त्यांना  सामना करावा लागला.

हेही वाचा >>> फुकट्यांचा प्रथम श्रेणी, वातानुकूलित प्रवाशांना ताप; विशेष मोहिमेत ३७९ विनातिकीट प्रवाशांवर कारवाई

‘संज्ञापन व पत्रकारिता विभागाचे प्रमुख सुंदर राजदीप यांच्याबरोबर परीक्षा नियंत्रक डॉ. प्रसाद कारंडे यांची ३० नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे. घडलेल्या प्रकारासंदर्भात त्यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. सर्व बाबी तपासून संज्ञापन व पत्रकारिता विभागाची एटीकेटीची परीक्षा पुढे ढकलण्याबाबत विचार करण्यात येईल, असे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे जनसंपर्क अधिकारी विनोद मळाले यांनी सांगितले. संज्ञापन व पत्रकारिता विभागाचे प्रमुख सुंदर राजदीप यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क होऊ शकला नाही. आता परीक्षा पुढे ढकलण्यात येते की अर्ज भरू न शकल्यामुळे परीक्षेला मुकावे लागते याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Atkt exam wednesday deadline for submission of application monday 3 pm mumbai print news ysh