एटीएम केंद्रांच्या सुरक्षेविषयक राज्य सरकारच्या आदेशांचे पालन करायचे, तर त्यापोटी कराव्या लागणाऱ्या वाढीव खर्चाची वसुली ही ग्राहकांकडून करण्याचा प्रस्ताव बँकांकडून पुढे आला आहे. रिझर्व बँकेकडून हा प्रस्ताव मान्य झाल्यास सध्या जवळपास नि:शुल्क असलेल्या एटीएममधील प्रत्येक उलाढालीसाठी सहा रुपयांपर्यंत शुल्क चुकते करण्याची ग्राहकांना तयारी ठेवावी लागेल.
प्रत्येक एटीएम केंद्राच्या आत आणि बाहेर सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्याच्या आणि अहोरात्र सुरक्षारक्षकाच्या तैनातीचे आदेश गेल्याच आठवडय़ात राज्याचे गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि बँक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत दिला. एटीएम केंद्रांबाहेर सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यासाठी बँकांना जानेवारी २०१४ पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. गेल्या महिन्यात बंगळुरू येथे एटीएममधून पैसे काढणाऱ्या महिलेवर झालेल्या हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यांत एटीएम केंद्रांबाबत सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आणि सुरक्षाविषयक सूचना न पाळणाऱ्या अनेक एटीएम केंद्रांना टाळेही ठोकण्यात आले.
तथापि प्रत्येक एटीएम केंद्राच्या देखभालीवर सध्या होणारा दरमहा सरासरी ३६ हजार रुपये खर्चात, २४ तास सुरक्षारक्षक व अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यासाठी होणाऱ्या दरमहा १५ हजार रुपये खर्चाची भर पडेल, असे बँकांचे म्हणणे आहे. सतेज पाटील यांनी बोलाविलेल्या बैठकीला वाणिज्य बँकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भारतीय बँक महासंघाचे अधिकारीही उपस्थित होते. या अतिरिक्त खर्चाची तजवीज करणारा प्रस्ताव सामायिक रूपात बँक महासंघाकडून पुढे आला असल्याचे विश्वसनीयरीत्या समजते.
एटीएमचा वापर सशुल्क करण्याबरोबरीनेच, खात्यातील शिल्लक रक्कम, मिनी स्टेटमेंट वगैरे सेवांसाठी प्रत्येकी ९ रुपये शुल्क आकारणीचाही बँकांचा प्रस्ताव आहे. सध्या अनेक बँकांकडून महिन्याला कितीही वेळा एटीएमचा वापर नि:शुल्क आहे, त्यावर महिन्यातून केवळ पाचवेळा अशी मर्यादा येण्याचीही शक्यता आहे. तर ग्राहकाने त्यांचे खाते नसलेल्या अन्य बँकांचे एटीएम वापरून रोख रक्कम काढल्यास त्यापोटी काही विशिष्ट शुल्क आकारण्याचा काही वर्षांपूर्वी सुरू असलेला प्रघात बँकांकडून पुन्हा सुरू होण्याचेही संकेत आहेत. रिझव्र्ह बँकेच्या लेखीही ग्राहकांच्या सुरक्षिततेला पहिले प्राधान्य असल्याने, बँकांकडून पुढे आलेल्या वरीलपैकी काही प्रस्तावांना लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
‘एटीएम’चे अर्थकारण!
*३६ हजार रुपये : प्रत्येक केंद्रासाठी दरमहा देखभालीसाठी येणारा खर्च
*१५ हजार रुपये : सुरक्षेपोटी जादा खर्च करावी लागणारी रक्कम
*२०० : एका एटीएम केंद्रातून प्रतिदिन होणाऱ्या उलाढालींचे सरासरी प्रमाण.
* ६ ते ७.५ रुपये : वाढीव खर्चाच्या प्रति उलाढाल वसुलीचे गणित

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा