अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाची उकल येत्या चार-पाच दिवसांत होईल, अशी अपेक्षा राज्याच्या दहशतवादविरोधी पथकातील वरिष्ठ सूत्रांनी व्यक्त केली आहे. अशावेळी हा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपविण्याची घाई केली जाऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. आरोपींच्या अगदी मुळापर्यंत एटीएस अधिकारी पोहोचले असून कोणत्याही क्षणी आरोपी ताब्यात येतील, अशी परिस्थिती असल्याचेही या सूत्रांनी स्पष्ट केले.
या प्रकरणी स्थानिक पुणे पोलीस, पुणे तसेच मुंबई गुन्हे अन्वेषण विभाग व राज्याचा दहशतवादविरोधी विभाग समांतर तपास करीत आहेत. तपास योग्य दिशेने सुरू असून मारेकरी लवकरच हाती लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अशावेळी तपास ‘सीबीआय’कडे सोपविल्यानंतर आतापर्यंत केलेल्या तपासावर पाणी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तूर्तास या सर्व तपास यंत्रणांना योग्य तो वेळ दिल्यानंतरच सीबीआयकडे तपास सोपवावा, असे मतही काही माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.