अंबरनाथ येथील चिखलोली भागात नगरपालिकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या बी.एस.यू.पी योजनेला ग्रामस्थांचा विरोध असतानाही भूमिअभिलेख तसेच पालिका कर्मचाऱ्यांचे पथक बुधवारी त्या ठिकाणी सव्‍‌र्हे करण्यासाठी गेले होते. दरम्यान, संतप्त ग्रामस्थांनी या पथकावर हल्ला चढवीत त्यांना मारहाण केल्याने पथकाला तेथून पळ काढावा लागला. या प्रकरणी अद्याप पोलीस ठाण्यात कोणत्याही प्रकारची नोंद करण्यात आलेली नाही.
स्वामीनगर तसेच प्रकाशनगर येथील झोपडपट्टीतील गरिबांना चिखलोली भागात बी.एस.यू.पी. योजनेंतर्गत घरे बांधण्याचा प्रस्ताव अंबरनाथ नगरपालिकेने मंजूर केला आहे. मात्र, हा प्रस्ताव मंजूर करताना विश्वासात न घेतल्याने चिखलोली येथील भूमिपुत्रांचा त्याला विरोध आहे. त्यासाठी भूमिपुत्रांनी मोर्चे, निवेदने देऊन विरोधही दर्शविला आहे.
असे असतानाही बुधवारी भूमिअभिलेख व पालिका कर्मचाऱ्यांचे पथक त्या जागेचा सव्‍‌र्हे करण्यासाठी गेले. तसेच या पथकाने कोणताही पोलीस बंदोबस्त घेतला नव्हता. दरम्यान, पथक जागेची पाहणी करीत असताना ग्रामस्थांनी लाठय़ाकाठय़ांनी त्यांच्यावर हल्ला चढविला. यामध्ये नगररचना विभागाचे आरेखक आर. एस. महाडीक यांना मारहाण झाली असून ग्रामस्थांनी कागदपत्रे (नकाशे)ही फाडून टाकले. या प्रकारामुळे पथकाला तेथून पळ काढावा लागल्याचे सूत्रांनी सांगितले.       

Story img Loader