कंत्राटदार कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेदरम्यान आयोगाच्या संकेतस्थळावरील प्रचंड गोंधळ आणि परिणामी परीक्षा पुढे ढकलली जाण्यास ‘वास्ट इंडिया’ ही कंत्राटदार कंपनी जबाबदार असल्याचा आरोप करीत आयोगाने कंपनीविरुद्ध मुंबई पोलिसांच्या सायबर सेलमध्ये मंगळवारी गुन्हा दाखल केला. त्यानंतर बुधवारी या प्रकरणी कंपनीच्या संचालकांसह दोघांना अटक करण्यात आली़
एमपीएससीची ७ एप्रिलची परीक्षा पुढे ढकलण्यासाठी व आयोगाची प्रतिमा मलीन करण्यासाठीच कंपनीने संकेतस्थळाला व्हायरसची बाधा झाल्याची खोटी ओरड केल्याचाही आयोगाचा आरोप आहे. नियोजित वेळापत्रकानुसार ७ एप्रिलला एमपीएससीची पूर्व परीक्षा होणार होती. मात्र, परीक्षेच्या दोन आठवडे आधी एमपीएससीच्या संकेतस्थळाला व्हायरसची बाधा झाल्याने परीक्षा रद्द करून १८ मेपर्यंत पुढे ढकलण्यात आली. प्रत्यक्षात ही परीक्षा देणाऱ्या उमेदवारांची माहिती हाताळणाऱ्या वास्ट इंडिया या कंपनीचा गलथनापणा या प्रकारला जबाबदार होता.
परीक्षेच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज भरून घेऊन त्यांची माहिती एकत्रित करणे आणि त्यांना परीक्षेपूर्वी प्रवेशपत्र उपलब्ध करून देणे ही या कंपनीची जबाबदारी होती. पण, आयोगाच्या संकेतस्थळावरून प्रवेशपत्र डाऊनलोड करून घेणे उमेदवारांना शक्य होत नव्हते. आयोगाने या संदर्भात व्हास्ट इंडियाकडे चौकशी केली असता कंपनीने आपल्या चुकांवर पांघरूण घालण्यासाठी व्हायरसची आवई उठविली होती. प्रत्यक्षात कंपनीच्या सव्‍‌र्हरला तांत्रिक बाधा झाल्याने त्यावर असलेली ३ लाख २२ हजार उमेदवारांची नष्ट झाली होती आणि ही चूक मानवी होती. परीक्षेच्या तोंडावर हा घोळ निस्तरता येणे शक्य नसल्याने आयोगाला राज्यभरात तब्बल ९३५ केंद्रांवर होणारी परीक्षा रद्द करावी लागली.
या संदर्भात आयोगाने उच्चस्तरीय समितीकडून चौकशी केली असता हा सगळा गोंधळ पुढे आला. केवळ याच नव्हे तर आधीच्या तीन वर्षांत झालेल्या परीक्षांची माहितीही या कंपनीने गहाळ केली आहे. पण, कंपनीने या संदर्भात आयोगाला अंधारात ठेवले. एमपीएससीने या संदर्भात वास्ट इंडियासोबत केलेला करार रद्द केलाच आहे. शिवाय हा सर्व प्रकार परीक्षा पुढे ढकलण्यासाठी जाणीवपूर्वक केल्याचा ठपका ठेवत पोलिसातही कंपनीविरोधात तक्रार दाखल केली आहे.

संचालकासह दोघांना अटक
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या उमेदवारांचा डेटा नष्ट करून परीक्षा लांबविण्यास कारणीभूत ठरणाऱ्या ‘वास्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीचा संचालक विवेक चांडेल (४१) आणि कंपनीचा आयटी तज्ज्ञ वीरेंद्र असोलकर (२५) यांना मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने बुधवारी अटक केली. कंपनीची हार्ड डिस्क आणि कागदपत्रेही पोलिसांनी जप्त केली आहेत.
सायबरसेलने मंगळवारी कंपनीच्या कार्यालयाची झडती घेऊन ३ सव्‍‌र्हर डिस्कसह ८ हार्ड डिस्क, १ नॅश बॉस्क (डेटा साठविण्याचे विशेष डिव्हाइस) जप्त केले आहे. या झडतीत काही कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहे. गुन्हा दाखल होऊन पोलिसांची चौकशी सुरू होताच कंपनीचा संचालक विवेक चांडेल हा सोलापूरहून फरारी झाला होता. परंतु पोलिसांनी त्याला नवी मुंबईतील महापे येथून अटक केली. तसेच कंपनीचा आयटी तज्ज्ञ वीरेंद्र असोलकर यालाही अटक केली.

Story img Loader