लोकसत्ता खास प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : वांद्रे परिसरात गस्त घालणार्‍या ओशिवरा पोलीस ठाण्यातील प्रभारी पोलीस निरीक्षक मनोज गुजर यांच्यावर हल्ला करणाऱ्या ४१ वर्षीय आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरूण चोप्रा असे आरोपीचे नाव असून त्याने मद्यप्राशन केले होते. दारुच्या नशेत त्याने पोलिसांशी हुज्जत घालून, शिवीगाळ केली आणि गुजर यांना मारहाण केल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीविरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला नोटीस देण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

मनोज गुजर हे वांद्रे येथील पोलीस अधिकारी वसाहतीत वास्तव्यास असून सध्या ते ओशिवरा पोलीस ठाण्यात प्रभारी पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. ते मंगळवारी रात्री गस्तीवर होते. त्यामुळे ते ओशिवरा – वांद्रे दरम्यानच्या परिसरातील विविध पोलीस ठाण्यांना भेटी देत होते. रात्री उशिरा ते वांद्रे येथील सिने अभिनेता सलमान खान याच्या ‘गॅलेक्सी’ अपार्टमेंटजवळील बंदोबस्त पाहण्यासाठी बी. जे. रोड परिसरातून जात होते. यावेळी नॅशनल बेकरीजवळील सिग्नल परिसरात एक व्यक्ती मद्यप्राशन करून वाहन चालवत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी त्याला थांबवून चौकशी केली. सदर व्यक्तीने चौकशी करणार्‍या पोलिसांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. काही वेळानंतर त्याने मनोज गुजर यांना मारहाण केली. यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करून त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आणि पोलीस ठाण्यात आणले.

आणखी वाचा-विक्रोळी मतदारसंघामध्ये मतांचे विभाजन कोणाला तारणार

याप्रकरणी मनोज गुजर यांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध पोलिसांशी हुज्जत घालणे, शिवीगाळ करून मारहाण करणे, सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. आरोपीचे नाव वरुण आकाश चोप्रा असून तो एका खाजगी कंपनीत कामाला आहे. सध्या तो वांद्रे येथील शेर्ली राजन रोड, वगोव्हील इमारतीमधील पहिल्या मजल्यावर राहतो. त्याला भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम ३५ (३) अन्वये नोटीस देण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Attack on police officer on patrol mumbai print news mrj