तृतीय पंथीयावर ब्लेडने हल्ला करून जबरदस्तीने फिनाईल पाजल्याप्रकरणी सांताक्रुझ पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे. तृतीयपंथीने केलेली लैंगिक अत्याचाराची तक्रार मागे घेण्यासाठी हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप केला असून पोलिसांनी याप्रकरणी तिघांविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.
सांताक्रुझ पश्चिम, जुहू तारा रोड येथील सी प्रिन्सेस हॉटेलजवळ हा प्रकार घडला. तक्रारदार २८ वर्षीय तृतीयपंथी असून तो रस्त्यावरून जात असताना तेथे तीन आरोपी रिक्षातून आले. लैंगिक अत्याचाराची तक्रार मागे घेत नसल्याकारणाने आरोपींनी तृतीयपंथीयाला मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यावेळी एका आरोपीने त्याला फिनाईल पाजले. त्याच्यासोबत आलेल्या तृतीयपंथीने ब्लेडने पाठीवर व हातावर वार केले. याप्रकरणी हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून एका तृतीयपंथीला अटक केली आहे. पीडित तृतीयपंथीने १० वर्षांपूर्वी दोन पुरूषांविरूद्ध लैंगिक अत्याचाराची तक्रार केली होती. त्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.