मुंबईः हातातील छत्री लागल्याच्या रागातून ३५ वर्षीय व्यक्तीने महिलेच्या पाठीत काचेचा तुकडा खुपसल्याचा प्रकार वरळी सीफेस परिसरात शनिवारी घडला. जखमी महिलेला तात्काळ परळ येथील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी शोध मोहिम राबवून पाच तासांत आरोपीला अटक केली.

शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास जखमी महिला अनिता बाळू पाटकर या वरळी परिसरातील जे के कपूर चौक येथून जात होत्या. त्यावेळी त्यांच्या हातातील छत्री तेथील एका व्यक्तीला लागली. त्या रागातून व्यक्तीने त्याच्या हातातील काचेचा तुकडा महिलेच्या पाठीत खुपसला. त्यामुळे त्या खाली कोसळल्या. महिलेला तात्काळ परळ येथील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी महिलेच्या मुलगा संदीप बाळू पाटकर याने वरळी पोलिसांकडे तक्रार केली.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र काटकर यांनी तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार धारदार शस्त्राने जखमी केल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलीस उपायुक्त (परिमंडळ ३) दत्तात्रय कांबळे व सहाय्यक पोलीस आयुक्त दत्तात्रय नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र काटकर यांनी तत्काळ पोलिस पथकाची नेमणूक करून याप्रकरणी तपासाचे आदेश दिले. गुन्हे शाखेच्या कक्ष-३ च्या पोलिसांनी याप्रकरणी समांतर तपासाला सुरूवात केली.

या गुन्ह्यांच्या तपासाच्या अनुषंगाने वरळी पोलीस गुन्हे प्रकटीकरण पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुतार पोलीस हवालदार गोलटकर, पोलीस शिपाई चव्हाण, पोलीस शिपाई केसकर, पोलीस शिपाई सावका तसेच गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार देवार्डे, विकास चव्हाण, भास्कर गायकवाड यांनी सीसीटीव्ही चित्रिकरण तपासले असता आरोपी प्रेमनगर येथे असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने तेथे छापा टाकून आरोपीला ताब्यात घेतले.

सचिन भगवान अवसरमोल (३५) अशी आरोपीची ओळख पटली असून तो संभाजी नगरमधील चिकलठाणा येथील रहिवासी आहे. आरोपीने गुन्ह्यात वापरलेला काचेचा तुकडा पोलिसांनी हस्तगत केला. हल्ल्यात आरोपीने ११ सेंटीमीटर बाय पाच सेंटीमीटर एवढ्या काचेच्या तुकड्याने हल्ला केला होता. तो काचेचा तुकडा न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहे. प्रेमनगर येथून आरोपीला ताब्यात घेऊन वरळी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तेथे चौकशीत त्याने गुन्हातील सहभागाबाबत कबुली दिली. त्यानंतर आरोपीला याप्रकरणी अटक करण्यात आली. अशा प्रकारे तंत्रज्ञानाच्या मदतीने पोलिसांनी तपास करून आरोपीला पाच तासांत अटक केली.