मुंबई : भायखळा येथे दोन शिवसैनिकांच्या वाहनांवर हल्ला झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात व्यक्तींनी या दोन शिवसैनिकांवर तलवारीने हल्ला केला. या हल्ल्यातून दोघेजण थोडक्यात बचावले. याप्रकरणी भायखळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.
हल्ल्याचे वृत्त समजताच असंख्य शिवसैनिक भायखळा पोलीस ठाण्याजवळ जमले होते. शिवसेना विभाग क्रमांक ११ चे उपविभागप्रमुख विजय कामतेकर व भायखळा विधानसभा समन्वयक बबन गावकर गुरुवारी रात्री १२ च्या सुमारास मोटारगाडीतून माझगाव येथील ई. एस. पाटणवाला मार्गावरून जात होते. यावेळी अचानकपणे दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात व्यक्तींनी कामतेकर, गावकर यांच्या वाहनावर हल्ला केला. अज्ञात व्यक्तींनी मुखपट्टी परिधान केली होती. या हल्ल्यात कामतेकर, गावकर थोडक्यात बचावले. हल्ल्याची बातमी कळताच शिवसैनिकांनी भायखळा पोलीस ठाण्यात धाव घेतली. कामतेकर आणि गावकर यांना पोलीस संरक्षण दिले जावे, अशी मागणी केली. या प्रकरणी भायखळा पोलीस तपास करीत आहेत.
हेही वाचा->> “शहाजहॉंने ताजमहलसाठी निविदा काढली नव्हती, मग मी सरकारी कामांसाठी का काढू”, गोव्यातील मंत्र्याचं विधान
स्थानिक शिवसेना शाखेस उद्धव ठाकरे यांची भेट
शिवसेना पदाथिकारी बबन गावकर आणि विजय कामतेकर यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी भायखळय़ातील शिवसेना शाखा क्र. २०८ ला भेट दिली. हल्ल्यानंतर पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिल्याची माहिती दोन्ही शिवसैनिकांनी दिली. त्यावर ठाकरे यांनी या भागातील पोलीस ठाण्याचे प्रमुख कोण आहेत अशी विचारणा करीत पोलिसांनी राजकारणात पडू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली.