उपनगरी गाडीत अमेरिकन तरुणी मिशेल मार्क(२४) वर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराला पकडण्यासाठी पोलिसांनी सहा विशेष पथके तयार केली असून संशयित हल्लेखोराचे रेखाचित्रही प्रसिद्ध केले आहे. आतापर्यंत पोलिसांनी २८ संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली मात्र खरा हल्लेखोर अद्याप हाती लागलेला नाही. रविवारी संध्याकाळी चर्चगेटहून निघालेल्या उपनगरी गाडीत मरिन लाईन्स आणि चर्नीरोड दरम्यान महिलांच्या प्रथम वर्गाच्या डब्यात मिशेलवर अज्ञात हल्लेखोराने ब्लेडने हल्ला करून तिचा ‘आयफोन’ हिसकावून पळ काढला होता.
मिशेल आपला भाऊ रायन सोबत गेल्या वर्षी मुंबईत आली होती. एका स्वयंसेवी संस्थेत ती काम करते. गोरेगाव येथे राहणारी मिशेल रविवारी दुपारी कुलाबा येथील चर्चमध्ये गेली होती. घरी परतण्यासाठी तिने चर्चगेटहून सुटणारी बोरिवली गाडी पकडली होती. पाचच्या सुमारास महिलांच्या प्रथम वर्ग डब्यात मरिन लाईन्स येथे एका तरुणाने गाडीत शिरून मिशेलच्या हातातील ‘आयफोन’ हिसकावण्याचा प्रयत्न केला. तिने विरोध करतात त्याने ब्लेडने तिच्यावर वार केले. हल्लेखोर हा २५ ते ३० वर्ष वयोगटाचा असून त्याने भगव्या रंगाचा टी शर्ट घातला होता, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त प्रदीप बिजवे यांनी दिली. या घटनेची माहिती अमेरिकन दुतावासाला कळविल्याचेही बिजवे यांनी सांगितले.
तपासासाठी विशेष पथके
हल्लेखोराच्या तपासासाठी रविवारी रात्रीच पोलिसांनी एकूण सहा पथके स्थापन केली आहेत. त्यातील दोन स्थानिक गुन्हे शाखा आणि चार पथके रेल्वे पोलिसांची आहेत. प्रत्येक पथकात एक अधिकारी आणि पाच कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पोलिसांनी परिसरातील सर्व ‘सीसीटीव्ही’ फुटेज गोळा केले असून ते मिशेलला दाखविण्यात येणार आहे. परिसरातले गर्दुल्ले, भुरटे चोर आदी २८ जणांना ताब्यात घेऊन चौकशी केल्याचे रेल्वेच्या स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी डी वडमारे यांनी सांगितले. मिशेलचा भाऊ रायन याने माध्यमांनी हा प्रकार समोर आणल्याबद्दल त्याने आभार मानले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा