लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबईः पत्नी कामावर गेली असताना १६ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ५० वर्षीय पित्याला मालाडा पोलिसांनी अटक केली. यावेळी विरोध केला असता आरोपीने पीडित मुलीसह तिच्या बहिणीलाही मारहाण केली. याप्रकरणी पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी विनयभंग व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला.
३६ वर्षीय तक्रारदार कामाला गेल्या होत्या. त्यांचे पत्नी कोणताही कामधंदा करीत नसल्यामुळे घऱीच असतात. फेब्रुवारीमध्ये तक्रारदार महिलेच्या १६ व १४ वर्षांच्या मुली घरी एकट्याच होत्या. त्यावेळी आरोपीने घराचा दरवाजा बंद करून १६ वर्षीय मुलीचा विनयभंग केला, तसेच तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. त्याला विरोध केला असता आरोपीने दोन्ही मुलींना मारहाण केली. पण पित्याच्या भीतीने हा प्रकार पीडित मुलीने आईला सांगितला नाही. अखेर धाडस करून पीडित मुलीने नुकताच आईला हा प्रकार सांगितल्यानंतर तिने याप्रकरणी मालाड पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी सोमवारी सायंकाळी विनयभंग व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपीने पित्याला राहत्या घरातून सोमवारी मध्यरात्री अटक केली.