शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न ‘लष्कर-ए-तोयबा’ने प्रयत्न केले होते, अशी कबुली पाकिस्तानी-अमेरिकी दहशतवादी डेव्हिड हेडली याने बुधवारी दिली. या खटल्यातील सहआरोपी अबू जुंदाल याच्या वकिलांकडून हेडलीची उलटतपासणी सध्या घेण्यात येते आहे. त्यावेळी त्याने ही माहिती दिली.
बाळासाहेबांवर हल्ल्याचा प्रयत्न कोणी केला होता आणि तो अपयशी का ठरला, असा उलट प्रश्न अबू जुंदालचे वकील वहाब खान यांनी हेडलीला विचारल्यावर त्याने प्रयत्न अपयशी का ठरला, हे मला माहिती नाही. पण ज्या व्यक्तीकडे हे काम सोपविण्यात आले होते. तो मला माहिती होता. त्याला नंतर पोलिसांनी पकडले होते. पण तो पोलिसांच्या कोठडीतून पळून जाण्यात यशस्वी ठरला होता, असे उत्तर हेडलीने दिले.
भारतात आल्यावर आपण दोनवेळा शिवसेना भवनाला भेट दिली होती, असेही हेडलीने यावेळी सांगितले. देशात लष्कर-ए-तोयबाने केलेल्या इतर हल्ल्यांबद्दल आपल्याला काही माहिती नाही, असे उत्तर त्याने दिले.
तत्पूर्वी लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा सदस्य असल्याची माहिती माझा सहकारी तहावुर राणा आणि शिकागोमधील इमिग्रेशनचे काम करणारा पाकिस्तानी नागरिक या दोघांनाही होती, अशी माहितीही डेव्हिड हेडली याने दिली.
संग्रहित लेख, दिनांक 24th Mar 2016 रोजी प्रकाशित
बाळासाहेबांवर हल्ल्याचा प्रयत्न ‘लष्कर-ए-तोयबा’ने केला होता, हेडलीची कबुली
या खटल्यातील सहआरोपी अबू जुंदाल याच्या वकिलांकडून हेडलीची उलटतपासणी
Written by लोकसत्ता टीम

First published on: 24-03-2016 at 10:18 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Attempt was made to assassinate bal thackeray david headley