मुंबई: आमदार आशीष शेलार यांच्यामार्फत मुंबई महानगरपालिकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून फसवणुकीचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शेलार यांच्या स्वीय साहाय्यकाने केलेल्या तक्रारीवरून वांद्रे पोलिसांनी तोतयागिरी, फसवणूक व गुन्ह्यांचा प्रयत्न केल्याप्रकरणी शुक्रवारी गुन्हा दाखल केला. फेसबुवकवरील नोकरीबाबतच्या जाहिरातीवरून हा प्रकार उघड झाला.
शेलार यांची परिचित असलेल्या श्रद्धा दळवी यांनी फेसबुकवर सरकारी नोकरी मिळवून देण्याबाबत २४ डिसेंबर रोजी एक संदेश पाहिला होता. त्यांनी संबंधित क्रमांकावर दूरध्वनी केला असता त्या व्यक्तीने आपण महानगरपालिका मुख्यलयातून बोलत असल्याचे सांगितले. आपण महानगरपालिकेत नोकरी मिळवून देण्याचे काम करतो. त्यासाठी चार लाख रुपये द्यावे लागतील. एक लाख आगाऊ व तीन लाख रुपये काम झाल्यानंतर द्यावे, असे त्याने सांगितले. त्यावेळी दळवी यांनी कामयस्वरूपी नोकरीबद्दल विचारणा केली असता आमदार आशीष शेलार यांच्यामार्फत काम केले जाईल, असेही त्याने सांगितले.
त्यानंतर दळवी यांनी घडलेला प्रकार आशीष शेलार यांच्या कानावर घातला. त्यानंतर शेलार यांचे स्वीय साहाय्यक नवनाथ सातपुते यांच्या तक्रारीरवरून वांद्रे पोलिसांनी याप्रकरणी तोतयागिरी, फसवणूक, गुन्ह्याचा प्रयत्न व माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. याप्रकरणी फेसबुकवरील दूरध्वनी क्रमांकाची माहिती पोलिसांना देण्यात आली असून त्याच्या मदतीने तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.