मुंबई : गावदेवी परिसरातील ‘टोरेस’च्या सील केलेल्या शोरूममध्ये चोरीचा प्रयत्न झाल्याचा प्रकार घडला आहे. टोरेस प्रकरणात तपास करणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेने गावदेवीमधील संबधीत शोरूम ७ मार्च २०२५ ला सील केले होते. चोरीचा प्रयत्न केल्याप्रकरणी गावदेवी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या शोरूमच्या शेजारचे दुकानही अनोळखी चोरट्याने फोडले आहे. याप्रकरणी पोलीस सीसीटीव्हीच्या मदतीने तपास करत आहेत.
आर्थिक गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्रीधर शंकर राव भोईटे (५६) यांनी तक्रार केली आहे. तक्रारीनुसार, ते आणि त्यांची पथक, पोलीस निरीक्षक रमेश यादव यांच्यासोबत, शुक्रवारी सकाळी १० वाजता सील केलेल्या शोरूमजवळ गेले. तेथे पोहोचल्यावर शोरूमला लावलेली सील तोडून लोखंडी शटर उघडलेले दिसले. भोईटे यांनी त्वरित आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. या शोरूमच्या शेजारी असलेल्या दुचाकीचे शटरचे टाळेही फोडण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणी सराईत आरोपीचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे.
गुंतवणूकदारांचे नुकसान
टोरेस गैरव्यवहारात मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि मीरा-भाईंदर या भागांतील हजारो गुंतवणूकदारांचे या प्रकरणात कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. हा संपूर्ण कट युक्रेन देशातील नागरिक असलेल्या मुख्य आरोपीने रचला होता. या प्रकरणात आरोपी असलेले युक्रेन देशाचे आठ नागरिक आणि एक तुर्कस्तान देशाचा नागरिक सध्या फरार आहेत. टोरेस प्रकरणातील मुख्य सूत्रधाराने गैरव्यवहारातील २०० कोटी रुपये परदेशात पाठवल्याचा संशय आहे.