मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत पती-पत्नीला एकाच घराचा एकावेळी लाभ घेता येतो. असे असताना एक घर घेतल्यानंतर दुसऱ्या झोपु योजनेत दुसऱ्या घराचा लाभ घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांची पात्रता रद्द करण्याचा निर्णय म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या सक्षम प्राधिकरणाने घेतला आहे. खोटी कागदपत्रे सादर करून झोपुतील घर लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच जणांची पात्रताही रद्द केली आहे. आता या सातही जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत मुंबईतील झोपड्यांचे पुनर्वसन करण्यात येते. म्हाडाच्या जागेवरील झोपु योजनेतील रहिवाशांची पात्रता ही मुंबई मंडळाच्या सक्षम प्राधिकरणाकडून निश्चित केली जाते. तर पात्रतेसंबंधीचे अपीलही सक्षम प्राधिकरणाकडे येतात. त्यानुसार सक्षम प्राधिकरणाकडे काही अपीलावर नुकतीच सुनावणी झाली. त्यादरम्यान दोन अर्जदारांनी एकदा झोपु योजनेचा लाभ घेतलेला असतानाही परत झोपु योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न करत सरकारी यंत्रणांची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले. दुसऱ्या एका प्रकरणात पती किंवा पत्नी एकलाच झोपु योजनेतील एका घराचा लाभ घेता येतो. मात्र पती एका योजनेसाठी आधीच पात्र असताना पत्नी दुसऱ्या योजनेसाठी पात्र ठरल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पत्नीची पात्रता रद्द करण्यात आली आहे. अजून एका प्रकरणात एकाच झोपडीसाठी मतदार यादीच्या आधारे तीन जणांची पात्रता निश्चिती करण्यात आली होती. सर्व कागदपत्रांची पडताळणी केली असता दोन जण वेगवेगळ्या कारणाने अपात्र असल्याचे सिद्ध झाले असून दोघांची पात्रता रद्द करण्यात आली आहे. अन्य काही प्रकरणात दोन जणांची पात्रता रद्द करण्यात आली आहे.
हेही वाचा – मुंबई : विद्याविहारमधील सोमय्या महाविद्यालयाला कारणे दाखवा नोटीस
एकूणच या सर्व झोपडीधारकांनी सरकारी यंत्रणांची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कायद्यानुसार या सातही जणांविरोधात कडक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. त्यानुसार या सातही जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
© The Indian Express (P) Ltd