लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबई : बनावट पारपत्राच्या आधारे परदेशात जाण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या एका तिबेटीयन महिलेस इमिग्रेशन अधिकार्यांनी ताब्यात घेऊन सहार पोलिसांच्या स्वाधीन केले. लोबसांग देशी दोलोबसांग येशी (३९) असे आरोपी महिलेचे नाव असून तिच्याविरुद्ध फसवुणकीसह पारपत्र कायद्यातील कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपी महिलेला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी सहार पोलीस अधिक तपास करीत आहेत.
पोलीस शिपाई उज्ज्वला पवार यांनी याप्रकरणी तक्रार केली आहे. उज्ज्वला पवार विशेष शाखा-२ येथे कार्यरत असून सध्या त्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरील इमिग्रेशन विभागात काउंटर अधिकारी म्हणून नियुक्तीवर आहेत. तक्रारनुसार, मंगळवारी २ ऑक्टोंबर रोजी पहाटे ३ वाजता लोबसांग इमिग्रेशनसाठी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आली होती. तिने तिचे पारपत्र, बोर्डिंग पास आणि तिकिट सादर केले. ती पोलंडला जाणार होती. तिच्या पारपत्राची पाहणी केली असता तिला ते बंगळुरू पारपत्र कार्यालयातून जारी करण्यात आल्याचे निदर्शनास आले. ही महिला तिबेटीयन नागरिक असल्याचा संशय आल्याने तिला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. तिची चौकशी केली असता आपण तिबेटीयन नागरिक असल्याचे तिने कबुल केले. तिबेटमधून ती १८ वर्षांपूर्वी भारतात आली होती. तेव्हापासून ती कर्नाटकात वास्तव्यास होती. तिबेटीयन नागरिक असल्यामुळे तिने कर्नाटकच्या म्हैसूर शहरात तिबेटीयन सेंटलमेंट कार्यालयात नोंदणी केली होती. त्यानंतर तिने नोंदणी कालावधी वाढवून घेतला होता. गेल्या वर्षी तिने बंगळुरूमध्ये बनावट भारतीय दस्तावेज बनवून पारपत्रासाठी अर्ज केला. त्यानंतर तिला पारपत्र मिळाले.
आणखी वाचा-मेट्रो ३ : आरे – बीकेसी भुयारी मेट्रोच्या संचलनाचा मार्ग मोकळा
याच पारपत्रावर ती पोलंडला जाण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आली होती. मात्र तिचे बिंग फुटले आणि तिला अधिकार्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी सहार पोलिसाकडे सोपविले. बनावट कागदपत्रांच्या साहाय्याने भारतीय पारपत्र मिळवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच गुन्ह्यात नंतर तिला सहार पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर तिला न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने तिला पोलीस कोठडी सुनावली. तिला बनावट भारतीय दस्तावेज कोणी बनवून दिले, पासपोर्टसाठी कोणी मदत केली याचा तपास पोलीस करीत आहेत. प्राथमिक तपासानुसार महिलेने पारपत्र दलालांकडून ते पारपत्र बनवल्याचा संशय आहे. त्याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.