मुंबई : काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता त्यांच्यापाठोपाठ देवरा यांचे समर्थकही शिवसेनेत जाणार का याची उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यातच बुधवारी पालिकेमध्ये पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या पत्रकार परिषदेत देवरा यांचे समर्थक आमदार अमीन पटेल आल्यामुळे चर्चेला उधाण आले होते. व्यासपीठावर केसरकर यांच्या शेजारी पटेल बसल्यामुळे ते शिवसेनेत प्रवेश करणार का अशी चर्चा सुरू झाली.
देवरा यांचे खंद्दे समर्थक समजले जाणारे मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस आमदार अमिन पटेल शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे. त्यातच बुधवारी मुंबई महापालिका मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दीपक केसरकर यांच्यासोबत पटेल उपस्थित होते. केसरकर यांनी शालेय शिक्षण विभागाशी संबंधित एका विषयावर पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी त्यांच्याबरोबर अमिन पटेल हे देखील उपस्थित होते. एवढेच नाही तर पत्रकार परिषदेत ते व्यासपीठावर केसरकर यांच्या चक्क बाजूला बसले होते.
हेही वाचा >>>मुंबईतील ‘या’ विभागात १७ आणि १८ जानेवारीला पाणी नाही; आजच पाण्याचा साठा करावा लागणार
काँग्रेस नेते माजी खासदार मिलिंद देवरा यांनी दोनच दिवसांपूर्वी सहा माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे देवरा गटाचे कट्टर समर्थक येणाऱ्या काळात शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, देवरा यांच्या सोबत त्यांच्या खास मर्जीतील अमिन पटेल यांनी शिवसेनेत प्रवेश न केल्यामुळे काँग्रेसमधील सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. देवरा व पटेल यांच्यात कौटुंबिक संबंध आहेत. त्यामुळे देवरा यांना सोडून पटेल काँग्रेससोबत राहूच शकत नाहीत, असे काँग्रेसमधील कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. मात्र देशातील सध्याचे धार्मिक ध्रुवीकरणाचे वातावरण असताना अमिन पटेल हे असा निर्णय घेतील का अशीही शंका उपस्थित केली जात आहे.
अमित पटेल यांना मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी, यासाठी देवरा यांनी पक्षनेत्या सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्याकडे शिफारस केली होती. त्यामुळे येणाऱ्या काळात पटेल देवरांच्या पावलावर पाऊल ठेवून शिवसेनेत प्रवेश करतील, अशी चर्चा रंगली आहे. याबाबत पत्रकारांनी त्यांनी हटकले असता हसून त्यांनी प्रश्न टाळण्याचा प्रयत्न केला. केवळ मतदार संघातील कामानिमित्त पालकमंत्री या नात्याने दीपक केसरकर यांची भेट घेण्यासाठी महापालिका मुख्यालयात आलो होतो. केवळ केसरकर यांच्या आग्रहाखातर आपण व्यासपीठावर बसल्याचे पटेल यांनी स्पष्ट केले.