भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया घरासमोर स्फोटकं ठेवणाऱ्या सचिन वाझेकडून ‘ब्रिफिंग’ घेत होते, असा घणाघाती आरोप भातखळकरांनी केला. तसेच हे महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिलं उदाहरण असेल, असं म्हणत त्यांनी निशाणा साधला. ते बुधवारी (२४ ऑगस्ट) विधानसभा अधिवेशनात बोलत होते.
अतुल भातखळकर म्हणाले, “अडीच वर्षे दलालांचं राज्य होतं आणि तुम्ही आज दीड महिन्याच्या सरकारवर बेछुट आरोप करत आहात. सचिन वाझेला विसरलात का? तो शिवसेनेचा प्रवक्ता होता म्हणून विसरत आहात का? की त्याने काही आश्वासनं दिली होती म्हणून त्याला सेवेत घेतलं.”
“सचिन वाझेला तात्काळ गुन्हे शाखेत घेण्यात आलं”
“सेवेत घेतलं तर घेतलं, सोबत त्याला तात्काळ गुन्हे शाखेत घेण्यात आलं. त्यातही महत्त्वाचं सीआययू युनिट देण्यात आलं. जेव्हा याच सदनात आरोप झाले तेव्हा सचिन वाझे म्हणजे ओसामा बिन लादेन आहे का असं विचारण्यात आलं,” असं भातखळकर यांनी सांगितलं.
“उद्धव ठाकरे अँटिलियासमोर स्फोटकं ठेवणाऱ्याकडून ‘ब्रिफिंग’ घ्यायचे”
भातखळकर पुढे म्हणाले, “मला तर असं कळलं की, सचिन वाझे वर्षावर जाऊन तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना रिपोर्टिंग करायचा. महाराष्ट्राच्या इतिहासातील हे पहिलंच उदाहरण असेल की राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पोलीस निरिक्षक रिपोर्टिंग करतो आहे. तेव्हा सीआयडीचं, गुप्तहेर विभागाचं ‘ब्रिफिंग’ घेतलं जात नव्हतं, पण ज्याने अँटिलियासमोर स्फोटकं ठेवली त्याचं ‘ब्रिफिंग’ घेतलं जात होतं.”
“विस्मरण शक्तीचा रोग लागला आहे?”
“असं असताना हे आत्ताच्या सरकारला निलंबित अधिकाऱ्यांना परत घेतलं म्हणून प्रश्न विचारत आहेत. अरे आपलं कर्तुत्व काय, आपला इतिहास काय, की विस्मरण शक्तीचा रोग लागला आहे? की सगळं विसरलात?” असा प्रश्न भातखळकरांनी विचारला.
“तुम्ही जरी विसरण्याचा प्रयत्न केला, तरी आमचे एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस तुम्हाला तुमची पापं विसरू देणार नाही. हे लक्षात ठेवा. हा अंतिम आठवडा प्रस्ताव म्हणजे तुमच्या महाभकासआघाडीचा अंतिम आठवडा प्रस्ताव आहे,” असाही इशाराही त्यांनी दिला.