राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे मंत्रालयासमोरील शासकीय बंगल्यांची नाव बदलण्याचा निर्णय ठाकरे सरकारकडून घेण्यात आला आहे. आतापर्यंत क्रमांकांवरून ओळखले जाणारे हे बंगले आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांच्या नावाने ओळखले जाणार आहेत. यासंदर्भातील अधिकृत जारी करण्यात आलंय. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्याला शिवगड देण्यात आलंय. जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत बंगल्याला शिवगड नाव दिल्याची माहिती देत ‘माझं भाग्य’ असं म्हटलंय. यावरूनच भाजपाचे अतुल भातखळकर यांनी आव्हाडांना टोला लगावला आहे.
“अरेरे थोडा उशीरच झाला, अनंत करमुसेंना शिवगडावर मार खाण्याचे भाग्य मिळाले नाही…”, असं भातखळकरांनी म्हटलंय.
अनंत करमुसे यांना जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्यांनी ऑक्टोबर महिन्यात मारहाण केली होती. यावरूनच भातखळकर यांनी आव्हाडांना टोला लगावला आहे. बंगल्याचं नाव बदलायला थोडा उशीर झाला, अनंत करमुसे यांना शिवगडावर मार खाण्याचे भाग्य मिळाले नाही, असं म्हणत भातखळकरांनी आव्हाडांना खोचक टोला लगावला.
अनंत करमुसे प्रकरण काय?
दिवाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवे लावण्याच्या आव्हानावर आव्हाड यांनी टीका केली होती. त्यानंतर अनंत करमुसे यांनी आव्हाड यांना एका आक्षेपार्ह फेसबुक पोस्टमध्ये टॅग केलं होतं. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप ठाण्यातील अनंत करमुसे यांनी केला होता. जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी घरातून उचलून नेऊन मारहाण केल्याचा आरोप करमुसे यांनी केला होता. मारहाण झाली तेव्हा यावेळी स्वत: जितेंद्र आव्हाडही त्याठिकाणी उपस्थित होते, असा दावा करमुसे यांनी केला होता. त्यानंतर ठाणे भाजपाने या प्रकरणी पोलीस आयुक्तांना पत्र लिहून या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती.
नंतर अनंत करमुसे मारहाण प्रकरणात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना ठाणे पोलिसांनी अटक केली आणि काही वेळातच जामिनावर त्यांची सुटका करण्यात आली होती.