Shaina NC vs Atul Shah: भाजपाच्या प्रवक्त्या आणि नेत्या यांना मुंबादेवीतून शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवारी मिळण्याच्या आधी त्यांनी औपचारिकपणे शिंदे गटात प्रवेश केला. मात्र त्यांच्या उमेदवारीला आता आता भाजपामधूनच विरोध होताना दिसत आहे. भाजपाचे नगरसेवक आणि ज्येष्ठ नेते अतुल शाह यांनी बंडाचे निशाण फडकवले असून ते अपक्ष म्हणून अर्ज भरणार आहेत. त्यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना आपली व्यथा मांडली. तसेच निवडणूक म्हणजे संगीत खुर्चीचा खेळ आहे का? असा प्रश्न पक्षाला विचारला. यावेळी त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अतुल शाह म्हणाले की, पाच वर्ष एखाद्या व्यक्तीने मतदारसंघात काम केल्यानंतर दुसऱ्याच कुणाला तरी तिकीट दिले जाते. हा काय संगीत खुर्चीचा खेळ आहे का? कुणालाही मतदारसंघावर थोपणे योग्य आहे का? जेव्हा मुंबादेवी मतदारसंघात पक्षाचे अस्तित्व नव्हते. तेव्हा मी याठिकाणी कामाला सुरूवात केली. नगरसवेक म्हणून निवडून आलो. करोना काळात लसीकरण केंद्र चालविले. ५० हजार लोकांचे लसीकरण केले. लाडकी बहीण योजनेसाठी मी तंबू लावून १२ हजार अर्ज भरून घेतले, त्यापैकी ८ हजार अर्ज पात्र ठरले.

मी तन-मन-धन अर्पून २४ तास पक्षासाठी काम केले. त्यानंतरही जर मला उमेदवारी नाकारली जात असेल तर मनाला वेदना होणारच. नेतृत्वाची चूक झाली आहे, त्यांनी आपली चूक सुधारावी. जशी आमच्याकडून चूक होते, तशी नेतृत्वाकडूनही चूक होऊ शकते, असेही आवाहन अतुल शाह यांनी केले.

हे वाचा >> Gopal Shetty : मुंबई भाजपमध्ये असंतोष; गोपाळ शेट्टी, अतुल शहा आदींचे अपक्ष अर्ज

शायना एनसी यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर एक्सवर पोस्ट केली होती. त्यात त्या म्हणाल्या, मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मनापासून आभारी आहे. महायुतीच्या नेतृत्वाने मुंबादेवी विधानसभेची जबाबदारी माझ्यावर टाकून इथल्या जनतेची सेवा करणयाची संधी दिली आहे.

बोरीवलीतून गोपाळ शेट्टी यांचीही बंडखोरी

भाजपाला यावेळी बंडखोरीचे ग्रहण लागल्याचे दिसते. भाजपाचे आणखी एक ज्येष्ठ नेते गोपाळ शेट्टी यांनीही बंडखोरी केली असून ते बोरीवली पश्चिम विधानसभेतून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. बोरीवली पश्चिमचे अनेक टर्म आमदार राहिलेल्या गोपाळ शेट्टी यांना २०१४ साली लोकसभेचे तिकीट देण्यात आले. २०१४ आणि २०१९ साली लोकसभेत विजय मिळविल्यानंतर २०२४ मध्ये मात्र त्यांचे तिकीट कापून पियुष गोयल यांना उमेदवारी देण्यात आली होती.

तसेच मागच्या तीन विधानसभा निवडणुकीत बोरीवली बाहेरील उमेदवार देण्यात आला आहे. २०१४ साली विनोद तावडे, २०१९ साली सुनील राणे आणि आता संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिल्यामुळे गोपाळ शेट्टी यांनी आपली नाराजी उघड केली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Atul shah veteran mumbai bjp leader rebels file nomination from mumbadevi assembly constituency after shaina nc gets mahayuti candidature kvg