मुंबई : वर्षानुवर्षे मालमत्ता कर थकवणाऱ्या बड्या थकबाकीदारांवर कठोर कारवाई करण्यास पालिका प्रशासनाने सुरुवात केली आहे. अंधेरीतील एका विकासकाच्या तीन गाड्या जप्त करून त्यांची लिलाव प्रक्रिया नुकतीच पूर्ण करण्यात आली. त्यामुळे मोठ्या थकबाकीदारांना आपोआप चाप बसेल अशी अपेक्षा पालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई महानगरपालिकेच्या करनिर्धारण व संकलक विभागाने मुंबईतील मोठ्या थकबाकीदारांकडून कर वसुलीसाठी कठोर पावले उचलली आहेत. वर्षानुवर्षे कर न भरणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांना नोटीसा पाठवल्यानंतरही त्याकडे काणाडोळा करणाऱ्या थकबाकीदारांच्या जंगम मालमत्ता जप्त करून त्याचा लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्याअंतर्गत पालिकेच्या के पश्चिम विभागाने मोठ्या थकबाकीदारांवर नोटीसा बजावल्या होत्या. त्यापैकी काही थकबाकीदारांनी करभरणा केला. मात्र बड्या विकासकाची १३ कोटी ८३ लाखांची थकबाकी असून त्याला अनेकदा नोटीस बजावण्यात आली होती. मात्र तरीही त्याने करभरणा न केल्यामुळे करनिर्धारण विभागाने त्याच्या तीन चार चाकी गाड्या जप्त केल्या होत्या. या गाड्यांचा ऑनलाईन पद्धतीने नुकताच लिलाव करण्यात आला.

हेही वाचा – मुंबई : आचारसंहितेपूर्वी महापालिकेच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोमवारी कार्यक्रमांचा धडाका

हेही वाचा – मुंबई : उन्हाच्या झळा वाढणार

या लिलावाद्वारे ९ लाख ९४ हजार रुपये प्राप्त झाले. लिलाव प्रक्रियेचा खर्च वगळून उर्वरित रक्कम मालमत्ता कर म्हणून जमा करण्यात आल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. अशा कारवायांमुळे मोठ्या थकबाकीदारांना जरब बसेल व ते करभरणा करतील असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.