स्वातंत्र्यवीर सावरकरांचे व्यक्तिचित्रण आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी सावरकर स्मारकाच्या विश्वस्तांनी एक आगळावेगळा उपक्रम सुरू केला आहे. यामध्ये सावरकरांच्या जीवनाची कथा नव्या पिढीसाठी एका वेगळ्या माध्यमातून दाखविण्यात येणार आहे. आज व्यक्तिचित्रण साकारण्यासाठी चित्रपट, नाटक, माहितीपट या माध्यमांचा वापर केला जात असताना त्रिमित मॅपिंग शोच्या साहाय्याने सावरकरांचे व्यक्तिचित्र पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.
यासाठी दादरच्या शिवाजी पार्क येथील सावरकर स्मारकाच्या बाहेरील ६६ फूट उंच आणि ९६ फूट रुंद भिंतीवर ही चित्रफीत दाखविण्यात येईल. ही चित्रफीत दृक्श्राव्य आणि त्रिमित पद्धतीने प्रेक्षकांना पाहता येणार आहे. यात स्मारकाच्या भिंतीबरोबरच तेथील भित्तिचित्रे, सावरकरांचा पुतळा या सगळ्याचा या त्रिमित प्रोजेक्शनमध्ये उपयोग करून घेण्यात आला आहे. यामध्ये तंत्रज्ञानाच्या साहाय्याने डोळे दिपवून टाकणारा प्रकाश-ध्वनीचा उपयोग करीत सावरकरांचा जीवनपटातील काही अंश या पद्धतीने दाखविण्यात येणार आहे. भारतामध्ये पहिल्यांदा अशा प्रकारचा उपक्रम राबविला असल्याचे स्मारकांच्या विश्वस्तांनी सांगितले. ‘जन्म ते अंदमानातून सुटका’ या कालखंडातील सावरकरांचे आयुष्य या चित्रफितीमध्ये दाखविण्यात येणार आहे. यासाठी स्मारकाच्या मागील बाजूला गॅलरी तयार करण्यात आली असून एकावेळी १०० ते १५० प्रेक्षक हा प्रयोग पाहू शकतात. यासाठी हैड्रोलिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून दिग्दर्शक ओम राऊत यांनी ही चित्रफीत साकारली आहे. यात काही प्रसंगांसाठी अ‍ॅनिमेशन पद्धतीचा वापर केला आहे.
सावरकरांचे आयुष्य जनतेपर्यंत पोहोचावे आणि मुख्यत: तरुण पिढीपर्यंत त्यांचा इतिहास पोहोचावा यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील आहोत. स्वातंत्र्यवीर स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांना त्रिमित मॅपिंगची कल्पना सुचली आणि त्यानंतर अनेकांच्या मदतीने हा प्रकल्प उभारण्यात आला असल्याचे स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे यांनी सांगितले. मुंबईकरांसाठी हा एक वेगळा अनुभव असेल.
सावरकरांनी नेहमी आधुनिकीकरणाचा पुढाकार केला असून त्यांचे व्यक्तिचित्रण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचणार असल्याचा आनंद आहे, असेही मराठे यांनी सांगितले. हा प्रयोग १० मेपासून प्रेक्षकांसाठी सायंकाळी ८ या वेळेत सुरू करण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा