मुंबई : करोनामुळे देशभरात अचानक जाहीर करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे सर्वसामान्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. देशात अंतर्गत सीमा आखल्या गेल्या. अन्न- वस्त्र, निवारा, वाहतुकीची साधने अशा कोणत्याही मूलभूत सुविधा नाकारली गेलेली अनेक माणसे या काळात परागंदा झाली. अनेकांचे रोजगार गेले. टाळेबंदीच्या काळातील हे भयाण वास्तव कृष्णधवल चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे.
हेही वाचा >>> खरंच हृतिक व सबा लग्न करणार आहेत? राकेश रोशन यांनी सांगितलं सत्य, म्हणाले…
‘आर्टिकल १५’, ‘अनेक’, ‘मुल्क’, ‘थप्पड’ अशा वेगळ्या धाटणीचे, रोखठोक वास्तव आशय-विषयाची मांडणी असलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी ‘भीड’चे दिग्दर्शन केले आहे. ‘भीड’ या चित्रपटात अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत आहेत. किती तरी वर्षांनी मोठ्या पडद्यावर कृष्णधवल चित्रपट पाहण्याची संधी प्रेक्षकांना ‘भीड’च्या निमित्ताने मिळणार आहे.
कृष्णधवलच का? ‘भीड’ चित्रपट कृष्णधवल का करण्यात आला? असा प्रश्न अनुभव सिन्हा आणि निर्माते भूषण कुमार यांना विचारला जात आहे. या प्रश्नाचे उत्तर देण्याआधी अनुभव सिन्हा, राजकुमार राव यांनी एक वेगळा प्रयोग या चित्रपटाच्या टीझरच्या निमित्ताने करून पाहिला. राजकुमार राव आणि अनुभव सिन्हा या दोघांनीही आपल्या समाजमाध्यमांवरून चित्रपटातील काही दृश्यांची कृष्णधवल छायाचित्रे पोस्ट केली होती. ही छायाचित्रे पाहिल्यानंतर साहजिकच १९४७ ला देशाला मिळालेले स्वातंत्र्य आणि फाळणीची ही दृश्ये आहेत, असा प्रतिसाद अनेकांनी दिला.
हेही वाचा >>> “लोकांचं आयुष्य…” सुम्बुल तौकीरने मुंबईमध्ये महागडं घर खरेदी करताच शिव ठाकरेची पोस्ट
‘भीड’ हा चित्रपट पुन्हा एकदा फाळणीच्या कथा-व्यथा मांडणार, असा होरा लोकांकडून बांधला गेला. मात्र ही सगळी दृश्ये, छायाचित्रे फाळणीच्या वेळची नव्हे, तर टाळेबंदीच्या काळातील आहेत हे स्पष्ट केल्यानंतर अनेकांना धक्का बसला. ‘टाळेबंदीच्या काळात जी सामाजिक विषमता लोकांनी अनुभवली ते वास्तव जसेच्या तसे लोकांसमोर यावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन चित्रपट कृष्णधवल करण्याचा निर्णय घेण्यात आला. आश्चर्य असे की ही दृश्ये फाळणीच्या वेळी लोकांना ज्या हालअपेष्टा सोसाव्या लागल्या त्याच्याशी साधर्म्य साधणारी आहेत. खरोखरच टाळेबंदीच्या काळात अनेकांच्या आयुष्यातील रंगच उडून गेले. देशांतर्गतच त्यांच्यासाठी सीमारेषा आखल्या गेल्या. लोकांना त्यांच्या घरी परतण्याचीही परवानगी नव्हती. मानवतेची भावनाच या काळात नाहीशी झाली होती’ असे अनुभव सिन्हा यांनी स्पष्ट केले. २४ मार्चला ‘भीड’ हा चित्रपट देशभरात प्रदर्शित होणार आहे.