मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाने ४ ते ६ जानेवारीदरम्यान वरळीमधील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम, एनएससीआय डोम येथे आयोजित केलेल्या ‘मराठी तितुका मेळवावा – विश्व मराठी संमेलन २०२३’साठी २० देशांमधील मराठी भाषेच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या विविध संघटना आणि भारतातील विविध शहरांतील संस्थांच्या प्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आले होते, परंतु या संमेलनाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याने आयोजकांची पंचाईत झाली. पहिल्या दिवशी मोकळय़ा खुर्च्या लक्ष वेधून घेत असल्याने ६ जानेवारी रोजी विविध शाळांमधील शिक्षक मंडळींना संमेलनास उपस्थित राहण्याचे सूचना पत्र ५ जानेवारी रोजी जारी करण्यात आले. मात्र तरीही संमेलनाच्या अखेरच्या दिवशी प्रेक्षकांची तुरळक गर्दी दिसत होती.
संमेलनाच्या पहिल्या दिवशी कार्यक्रमस्थळी केवळ निमंत्रितांना प्रवेश देण्यात येत होता, तर सर्वसामान्य नागरिकांना सरकट प्रवेश नव्हता, परंतु पहिल्याच दिवशी रिकाम्या खुर्च्या निदर्शनास आल्यामुळे, दुसऱ्या दिवशी सर्वसामान्य नागरिकांसाठी ऑनलाइन नावनोंदणी करून प्रवेश देण्यात आला. याचसोबत संमेलनस्थळी येणाऱ्यांना दोन्ही वेळेचा चहा, नाश्ता व जेवण मोफत देण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. पण, याचा उपयोग झाला नाही आणि पहिल्या दिवसाप्रमाणे दुसऱ्या दिवशीही मोठय़ा प्रमाणावर खुर्च्या रिकाम्याच होत्या. अखेर तिसऱ्या दिवशी सर्वसामान्य नागरिकांना कोणत्याही नाव नोंदणीशिवाय प्रवेश देण्यात आला, मात्र तरीही गर्दी तुरळकच होती. बऱ्याच खुर्च्या रिकाम्या होत्या.
मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर आणि इतर मंत्र्यांनी मराठी भाषिकांना मोठय़ा प्रमाणात या संमेलनात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. संमेलनास परदेशातील मराठी भाषिकांची गर्दी बऱ्यापैकी होती, परंतु स्थानिक मराठी भाषिकांनीच या संमेलनाकडे पाठ फिरवल्याचे दिसत होते. यानंतर मुंबईतील विविध महाविद्यालयांतील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विद्यार्थी, विविध शाळांमधील शिक्षकांना आमंत्रित करण्यात आले होते. शेवटच्या दिवशी विविध शाळा आणि महाविद्यालयांतील विद्यार्थी बसमधून कार्यक्रमस्थळी दाखल झाले होते, मात्र तरीही विश्व मराठी संमेलनस्थळी तिसऱ्या दिवशीही तुरळक गर्दी दिसत होती.
खर्च आणि उद्देश निरर्थक.. संमेलनासाठी महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाने कोटय़वधी रुपये खर्च केले. याचसोबत सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणाऱ्या कलाकारांना मोठय़ा रकमेचे मानधनही देण्यात आले होते. प्रेक्षकांनी पाठ फिरविल्यामुळे संमेलनासाठी केलेला खर्च आणि उद्देश निरर्थक ठरल्याची टीका होऊ लागली आहे.